तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचललेल्या महेंद्रसिंह धोनीने, भारतीय संघात कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आपण तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ ने मात केल्यानंतर धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. धोनीने ११४ चेंडूत ८७ धावांची खेळी केली.

“मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. प्रश्न हा आहे की, संघाला माझी गरज कोणत्या जागेवर आहे. मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली काय किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली काय संघाचा समतोल राखला जाणं गरजेचं आहे. मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही तयार आहे. १४ वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार नाही असं म्हणू शकत नाही.” धोनीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

अवश्य वाचा – IND vs AUS : भारतीय क्रिकेटला वाहून घेतलेला धोनीइतका कोणीही नाही – विराट कोहली

मेलबर्नच्या खेळपट्टीवर धावा काढणं कठीण जात होतं हे देखील धोनीने मान्य केलं. चौथ्या क्रमांकावर धोनीने केदार जाधवसोबत शतकी भागीदारी केली. केदारनेही धोनीला अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली. केदारच्या खेळाचंही धोनीने कौतुक केलं. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.