ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याचेच माझे लक्ष्य आहे, असे भारतीय संघात परतण्यासाठी उत्सुक असलेला फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने सांगितले. हरभजनच्या नेतृत्वाखाली पंजाबने विजय हजारे चषक एकदिवसीय सामन्याच्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. यानंतर तो म्हणाला, ‘‘या स्पर्धेतील कामगिरीबाबत मी समाधानी आहे. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्याबाबत मी आशावादी आहे. प्रत्येक खेळाडूसाठी विश्वचषक स्पर्धा अतिशय महत्त्वाची असते. मी नेहमीच सकारात्मक वृत्ती ठेवीत असतो. त्यामुळे माझीच मला प्रेरणा मिळत असते. विश्वचषक स्पर्धेपूर्वी होणाऱ्या स्थानिक सामन्यांमध्ये माझी कामगिरी चांगली होईल व मला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळेल अशी मला खात्री आहे.’’‘‘अंतिम लढतीत जरी आम्हाला कर्नाटकविरुद्ध दणदणीत पराभव स्वीकारावा लागला तरी अंतिम फेरीत स्थान मिळविणे हीदेखील आमच्यासाठी मोठी कामगिरी आहे. आम्ही विजेतेपद मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. यंदा आम्हाला अजिंक्यपद मिळाले नाही तरी पुढील वर्षी ते यश मिळविण्यासाठीच आम्ही खेळणार आहोत,’’ असेही हरभजन म्हणाला.