भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

ऑस्ट्रेलियात दौऱ्यात ११ दिवसांत सहा मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. त्यामुळेच मी हे सामने न खेळण्याचा मी निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण  भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा दिले आहेत.

‘‘मला पुनर्वसन प्रक्रियेसाठी साडेतीन आठवडय़ांचा कालावधीत हवा होता. जर मी दुखापत सावरण्यास वेळ दिला, तर कदाचित कसोटी सामने खेळू शकेन, अशी आशा होती. मी घेतलेला हा साधा निर्णय इतका जटिल का झाला, हे मलाही कळले नाही,’’ असे रोहितने सांगितले.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) डाव्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारांचा उपकर्णधार रोहितला काही सामन्यांसाठी विश्रांती घ्यावी लागली. परंतु दुखापतीमुळे भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांसाठी वगळलेला रोहित काही दिवसांत ‘आयपीएल’मध्ये परतल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्याचा भारताच्या कसोटी संघात आश्चर्यकारक समावेश करण्यात आला.  यासंदर्भात रोहित म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे तर काय घडत होते, याबाबत मला काहीच कळत नव्हते. लोक मात्र बरीच चर्चा करीत होते. परंतु मी मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व मुंबई इंडियन्सच्या सातत्याने संपर्कात होतो.’’

‘आयपीएल’च्या बाद फेरीमध्ये खेळण्याच्या निर्णयाबाबत रोहित म्हणाला, ‘‘दुखापत झाल्यानंतर पुढील दोन दिवस मी त्यानंतरचे १० दिवस काय करायचे, ही योजना आखली. मी ‘आयपीएल’च्या पुढील सामन्यांत खेळावे की खेळू नये, हे ठरवले. ऑस्ट्रेलियात खेळण्याविषयी अ, ब किंवा क नावाची व्यक्ती काय बोलते, हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचे नाही. ’’

काय घडले, याबाबत अनभिज्ञ!

माझी दुखापत गंभीर स्वरूपाची नव्हती, याची मला खात्री होती. परंतु काय घडले, याबाबत मी अनभिज्ञ आहे. परंतु येत्या काही दिवसांत मी ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी सज्ज होईन, अशी आशा रोहितने व्यक्त केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात ५० चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारत रोहितने मुंबईच्या पाचव्या ‘आयपीएल’ विजेतेपदाचा अध्याय लिहिला. सध्या रोहित बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत पुनरागमनाची तयारी करीत आहे. ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळणे मला कठीण जाणार नाही. मी परिस्थिती हाताळू शकेन, हे मी ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सला कळवले. स्वत:चे धोरण एकदा स्पष्ट झाले की, अंमलबजावणी कशी करावी, याकडे लक्ष देता येते,’’ असे रोहितने सांगितले.