न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला 4 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवासह यजमान संघाने 3 सामन्यांची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. भारताचं न्यूझीलंडमध्ये पहिला टी-20 मालिका विजय मिळवण्याचं स्वप्नही यामुळे अधुरं राहिलं. दिनेश कार्तिक आणि कृणाल पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं होतं. मात्र अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकने एका चेंडूवर धाव न घेता स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्यावरुन त्याला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागलं. यावर दिनेश कार्तिकने आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे.

अवश्य वाचा – कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी? विचारही नको….गांगुलीचा रवी शास्त्रींना सल्ला

“145/6 अशी परिस्थिती असताना मी आणि कृणाल पांड्याने चांगली फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी गोलंदाज तणावाखाली येतील अशा वळणावर आम्ही सामना आणून ठेवण्यात यशस्वीही झालो होतो. आम्ही आमचं काम चोख बजावत होतो, मात्र एकेरी धाव न घेतल्यानंतर मी षटकार मारु शकेन अशी मला खात्री वाटत होती, मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही.” दिनेश कार्तिक पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

गेल्या काही महिन्यांमध्ये दिनेश कार्तिक हा मधल्या फळीत भारताचा भरवशाचा फलंदाज म्हणून नावारुपास आला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशा कठीण प्रसंगात तुमच्या साथीदारावर विश्वास टाकणं महत्वाचं असतं. मात्र त्यावेळी माझ्याकडून तशी कृती घडली नाही, अशा गोष्टी क्रिकेटमध्ये होतच असतात, दिनेश कार्तिकने आपली बाजू मांडली. यावेळी अंतिम षटकांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्याचंही दिनेशने कौतुक केलं.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी धोनीचा अनुभव विराटसाठी महत्वाचा !