आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं स्थान टिकवून ठेवणं ही सोपी गोष्ट नसते. प्रत्येक सामन्यात आपली सर्वोत्तम कामगिरी करणं, इतर खेळाडूंशी स्पर्धा या सर्व दिव्यातून प्रत्येक क्रिकेटपटूला जावं लागतं. अनेकदा एका दुखापतीमुळे खेळाडू आपली संघातली जागा गमावतो. गेली काही वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला रॉबिन उथप्पा अजुनही भारतीय संघात पुनरागमनाबद्दल आशावादी आहे. Espncricinfo संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रॉबिन उथप्पाने आपले इरादे स्पष्ट केले.

“सध्याच्या घडीला मला हेच सिद्ध करायचं आहे की मी अजुनही स्पर्धेत आहे. माझ्यात अजुनही तोच उत्साह कायम आहे आणि त्यासाठी मी कोणासोबतही स्पर्धा करुन चांगली कामगिरी करुन दाखवायला तयार आहे. मला अजुनही आशा आहे की विश्वचषक संघात मला स्थान मिळू शकतं, मी त्या दृष्टीकोनातून प्रयत्नही करतोय. जर सर्व काही सुरळीत पार पडलं तर मी भारतीय संघात पुनरागमन करेन.”

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. २०१५ सालापर्यंत उथप्पाने भारताचं काही सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं. मात्र यानंतर त्याला संघातलं स्थान कायम राखता आलं नाही. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व करत होता. तेराव्या हंगामासाठीच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं.