भारतीय हॉकीसंघाचे मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी भारतीय हॉकी संघाची चांगलीच कानउघडणी केली आहे. जोपर्यंत भारतीय खेळाडू आपलं Interception Skill (प्रतिस्पर्धी खेळाडूच्या ताब्यात असलेल्या बॉल हिसकावण्याचं तंत्र) सुधरवतं नाहीत, तोपर्यंत भारताचा संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरच राहिलं. मरीन यांनी आगामी स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय खेळाडूंचे कान टोचले आहेत. आशिया चषकात अंतिम फेरीत मलेशियावर मात केल्यानंतर भारताला वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेत खेळायचं आहे. १ ते १० डिसेंबरदरम्यान भुवनेश्वरमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

“माझ्यामते भारतीय संघाला आणखी अनेक बाबींमध्ये सुधारणेस वाव आहे. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आक्रमक चाली रचणं ही भारतीय संघाची खासियत आहे, भारतीय संघाचा हा गुण अन्य कोणत्याही संघासाठी त्रासदायक ठरु शकतो. मात्र यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या ताब्यात असलेल्या बॉल आपल्याकडे ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. भारतीय खेळाडू सध्या या बाबतीत कच्चे आहेत. यात सुधारणा झाली नाही तर भारत आयुष्यभर सहाव्या क्रमांकावर राहिलं.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मरीन बोलत होते.

सध्या जागतिक क्रमवारीत भारताच्या पुढे; अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँड आणि जर्मनी हे संघ आहेत. यावेळी बोलताना मरीन यांनी भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची गरज असल्याचंही बोलून दाखवलं. कित्येकवेळा भारतीय संघ पहिल्या सत्रात जोशात खेळतो, मात्र नंतर अचानक त्यांच्यातली स्फुर्ती निघून जाते आणि याचा फायदा समोरचा संघ घेतो. कित्येकदा भारतीय संघाला याचा फटका बसला आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाचा चांगला पाठींबा मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू आपल्यातल्या या कमतरतेवर नक्की काम करतील, असा विश्वास मरीन यांनी व्यक्त केला आहे.

या स्पर्धेत भारत जिंकेल याची मी खात्री देऊ शकत नाही, कारण आशिया चषकात भारतासमोर तुलनेने सोपं आव्हान होतं. मात्र या स्पर्धेत भारताला तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचा सामना करायचा आहे. त्यामुळे आपल्या कमतरतांवर काम करुन भारतीय खेळाडूंनी कामगिरीत सुधारणा केली, तर नक्कीच काही आश्चर्यकारक निकाल लागू शकतात, असंही मरीन म्हणाले.