गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. संघात असताना तरुण गोलंदाजांना यष्टींमागून मार्गदर्शन करताना धोनीला आपण अनेकदा पाहिलं आहे. चहल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर आणि इतर गोलंदाजांनाही धोनी वारंवार चेंडू कुठे टाकायचा या सूचना देत असतो. भारतीय संघातला चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनेही धोनी संघात असताना आपण अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करायचो असं मान्य केलं आहे.

“मी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केलं, त्यावेळी मला खेळपट्टीचा अंदाज यायचा नाही. खेळपट्टीवर चेंडू वळत असेल किंवा खेळपट्टीवर गवत असेल तर चेंडू कुठे टाकायचा-टप्पा कुठे ठेवायचा या सर्व गोष्टींचा मी फारसा विचार करायचो नाही. धोनीमुळे या गोष्टी मला समजायला लागल्या. तो प्रत्येकवेळी मला चेंडू वळवायचा आहे की नाही, टप्पा कुठे ठेवायचा, चेंडू फास्ट टाकायचा आहे की नाही अशा सर्व गोष्टी सांगत असतो. माझे प्रशिक्षकही मला अशाच सूचना द्यायचे, धोनीसोबत असताना मला कधीही त्यांची उणीव भासली नाही.” कुलदीप माजी खेळाडू दीप दासगुप्तासोबत ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

धोनी संघात असताना मी अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करायचो. त्याच्याकडून अनेक गोष्टी मी शिकलोय, आम्हाला त्याची खरंच आठवण येते, कुलदीप धोनीबद्दल बोलत होता. “धोनी संघात असताना फिल्डींग कशी लावायची मी याकडे कधीही लक्ष दिलं नाही, ते काम धोनीच करायचा. फलंदाज कुठे मारण्याचा प्रयत्न करेल याचा त्याला पुरेपूर अंदाज असायचा आणि त्याप्रमाणे तो फिल्डींग लावायचा.” सध्या करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद आहे, धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील फार्म हाऊसमध्ये राहतो आहे.