रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावत स्पर्धेवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. चेन्नई सुपरकिंग्जनंतर सलग दुसऱ्यांना विजेतेपद राखणारा मुंबई आयपीएलच्या इतिहासातला दुसरा संघ ठरला. कर्णधार म्हणून रोहितचं हे पाचवं तर खेळाडू म्हणून सहावं विजेतेपद ठरलं. दुसरीकडे विराट कोहलीच्या RCB संघाला यंदाच्या हंगामात आश्वासक सुरुवात केल्यानंतरही अखेरच्या टप्प्यांत केलेल्या निराशाजनक कामगिरीचा फटका बसला. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी आणि अनेक माजी खेळाडूंनी भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद विराटने रोहितकडे सोपवावं अशी मागणी केली. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“या मुद्द्यावर माझे विचार स्पष्ट आहेत. विराट सध्या चांगलं नेतृत्व करतो आहे, आता फक्त तो किती दमला आहे ही गोष्ट महत्वाची आहे. २०१० पासून तो सातत्याने खेळतो आहे. दरम्यानच्या काळात विराटने खोऱ्याने धावा काढत आपल्या खात्यात ७० शतकं जमा केली आहेत. जर त्याला थकवा जाणवत असेल तर त्याने आता तीन पैकी एका प्रकारात कर्णधारपद रोहितकडे सोपवण्याचा निर्णय घ्यावा. आयपीएलदरम्यान मला त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. कदाचीत तो Bio Bubble मुळे असू शकले. तो थोडासा दबावाखालीही दिसला, तो कसा विचार करतो हे महत्वाचं आहे. रोहित कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार आहे.” शोएब अख्तर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. सध्या भारतीय खेळाडू सिडनीत असून २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना आटोपल्यानंतर विराट कोहली आपली पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परत येणार आहे.