मुंबई इंडियन्सचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफचे मत

सनरायजर्स हैदराबादविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात केलेली दमदार कामगिरी अविश्वसनीय असून आयुष्यभरासाठी मी या कामगिरीचे हृदयात जतन करेन, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा नवा उदयोन्मुख खेळाडू अल्झारी जोसेफने व्यक्त केली.

शांत स्वभावाच्या जोसेफने शनिवारी अवघ्या १२ धावांत हैदराबादच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून पदापर्णातच अनेक विक्रमांची नोंद केली. त्याच्या या कामगिरीमुळे मुंबईने ४० धावांनी विजय मिळवला. ‘आयपीएल’च्या इतिहासातील सवरेत्कृष्ट गोलंदाजी करताना त्याने राजस्थान रॉयल्सच्या सोहेल तन्वीरच्या (६/१४) मागे टाकले. त्याशिवाय पदार्पणातच सहा बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला असून त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अँड्रय़ू टायचा (५/१७) विक्रम मोडला. तसेच वयाच्या २२व्या वर्षी पाच बळी घेण्याची किमया साधणारा तो ‘आयपीएल’मधील सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे.

यासंदर्भात विचारले असता जोसेफ म्हणाला, ‘‘अविश्वसनीय! ‘आयपीएल’ कारकीर्दीची सुरुवात याहून दिमाखदार असूच शकत नाही. माझ्यासाठी हा क्षण फारच खास असल्यामुळे आयुष्यभरासाठी या कामगिरीचे मी जतन करेन.’’

‘‘माझा हा पहिलाच सामना असल्यामुळे संघाच्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावण्याच्या ध्येयानेच मी मैदानात उतरलो. धावफलकावर किती धावा आहेत याकडे लक्ष न देता मी फक्त माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवून अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याचे फळ मला मिळाले,’’ असेही २२ वर्षीय जोसेफने सांगितले.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्नेच्या जागी जोसेफचा गेल्या आठवडय़ातच मुंबईत समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय श्रीलंकेचा लसिथ मलिंगा मायदेशी परतल्यामुळे शनिवारी झालेल्या लढतीत जोसेफला प्रथमच अंतिम ११ खेळाडूंत स्थान देण्यात आले.

तुम्हाला हे माहीत आहे का?

आंतरराष्ट्रीय पातळीवर वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जोसेफला यंदा फेब्रुवारी महिन्यात जबर धक्का बसला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोसेफची आई श्ॉरन यांचे निधन झाले. मात्र यामधून सावरत जोसेफ तिसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीदेखील त्याच्या धर्याला मानवंदना दिली. त्याशिवाय दोन्ही संघांतील खेळाडूंनी हाताला काळ्या रंगाच्या फिती बांधून जोसेफच्या आईला श्रद्धांजलीसुद्धा वाहिली.