भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने, आपण स्वतःला सिनीअर खेळाडू मानत नसल्याचं म्हटलं आहे. ड्रेसिंग रुममध्ये असताना मी नेहमी वातावरण हसतं-खेळतं ठेवण्याचा प्रयत्न करतो, यामुळे नवीन खेळाडू अधिक खुलतात. आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनसाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओत विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – जाणून घ्या भारतीय क्रिकेट संघाचे 2019 सालचे वेळापत्रक

“मी कधीही सिनीअर खेळाडूसारखा वागत नाही. किंबहुना एखादा नवोदीत खेळाडू मला समोरुन मान देत असेल तरीही मी त्याच्याशी मित्रासारखं वागतो. कित्येकवेळा मी माझ्या तरुण सहकाऱ्यांना, माझ्याशी बोलताना गंभीर होऊन बोलण्याची गरज नाही हे सांगत असतो. एक कर्णधार म्हणून मी सर्वांना आपलासा वाटेन यासाठी माझे प्रयत्न असतात. आपल्या मनातल्या गोष्टी न बोलणं मला पटत नाही.”

आपल्या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने, आपल्या भावाबद्दलही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपलं करिअर घडवण्यात आपला भाऊ विकासचा मोठा वाटा असल्याचं विराटने म्हटलं. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. 3 जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर ह्या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याकडे भारतीय संघाचा कल असणार आहे.