30 मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ शनिवारपासून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू 23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होतील. मात्र विश्वचषकाच्या संघनिवडीसाठी आयपीएलमध्ये केलेली कामगिरी ग्राह्य धरली जाणार नाही असं स्पष्टीकरण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलं आहे. पहिल्या सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs AUS : विश्वचषकाआधी भारतीय संघाची शेवटची चाचणी परीक्षा

“आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीचा विश्वचषकासाठी विचार नक्कीच होणार नाही. अशा प्रकारची आशा करणं मला चुकीचं वाटतं. आयपीएलमध्ये खेळण्याआधी आम्हाला विश्वचषकात कोणता संघ उतरवायचा आहे याची कल्पना असलीच पाहिजे. त्यामुळे आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कशी कामगिरी करतो याचा विश्वचषकाच्या संघनिवडीवर परिणाम होणार नाही.” विराट कोहलीने आपली बाजू मांडली. विश्वचषकासाठी पर्यायी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकच्या निवडीसाठी आयपीएलमधल्या कामगिरीचा विचार केला जाईल अशी मध्यंतरी चर्चा सुरु होती. मात्र विराटने याची शक्यताही धुडकावून लावली आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : पहिल्या वन-डे सामन्याआधी भारताच्या गोटात चिंता, सरावादरम्यान धोनीला दुखापत

विराट कोहलीने आगामी सामन्यांमध्ये वन-डे संघात ऋषभ पंतला संधी देण्याचं बोलून दाखवलं आहे. मात्र त्याला संधी देताना संघाची घडी व्यवस्थित बसवणं गरजेचं आहे. एका गोलंदाजाला कमी करुन ऋषभला संघात जागा मिळणार नाही. याचसोबत ऋषभ यष्टीरक्षण करत नसताना क्षेत्ररक्षणाचाही विचार करावा लागत असल्याचं कोहलीने स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेदरम्यान ऋषभने गचाळ क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यामुळे भारताच्या विश्वचषक संघात कोणत्या खेळाडूची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : जेव्हा मुंबई इंडियन्स स्वतःच्याच कर्णधाराची जाहीर फिरकी घेतं