भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता बाबा बनणार आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दिकने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या लॉकडाउन काळात क्रिकेट बंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पांड्या दुखापतीमुळे सतत संघाबाहेर होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या तयारीत होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएल पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केलं आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्याशी गप्पा मारल्या.

२०१८ साली आशिया चषकात खेळत असताना हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर न्यावं लागलं होतं. “त्या क्षणी मला खरंच असं वाटलं होतं की माझं करिअर आता संपलं. मी याआधी कधीच कोणाला असं स्ट्रेचरवरुन घेऊन जाताना पाहिलं नव्हतं. मी दहा मिनीटं नुसता पडून बोतो, मला काहीच समजत नव्हतं. मला शुद्ध आल्यानंतर होणाऱ्या वेदना सहन होत नव्हत्या. परंतू त्यानंतर शरिराने मला साथ दिली आणि मी हळुहळु त्यातून सावरलो.” हर्षा भोगले यांच्याशी Cricbuzz संकेतस्थळाच्या पॉडकास्टमध्ये पांड्या बोलत होता.

दुखापतीमधून सावरल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणं हे आपल्यासाठी महत्वाचं आव्हान असणार आहे, असं हार्दिक म्हणाला. सध्या लॉकडाउन काळात सर्व क्रिकेटपटू घरी राहून आपल्या परिवाराची काळजी घेत आहेत. आंतरराष्ट्रीय सामने रद्द होत असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसी प्रयत्न करत आहे. परंतू याबद्दल अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.