आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे माझी मान शरमेने खाली झुकली आहे. या प्रकरणामुळे क्रिकेटची विश्वासार्हता कमी झाली असून कडक कायदा करूनच ती परत मिळवता येईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. ‘‘एक तरुण, क्रीडा चाहता आणि देशाचा क्रीडामंत्री या नात्याने माझी मान शरमेने खाली आली आहे. असे प्रकार वारंवार घडू नयेत, यासाठी एक यंत्रणा असायला हवी. असे प्रकार फक्त क्रिकेटच्या बाबतीतच नव्हे तर अन्य खेळातही घडू शकतात. त्यामुळे आतापासूनच असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे. ‘सामना निश्चिती’विरोधात नवा कायदा करण्यासाठी आम्ही सातत्याने गृह मंत्रालय, कायदे मंत्रालय यांच्याशी चर्चा करीत आहोत. पुढचे पाऊल टाकण्याआधी आम्ही महा न्यायप्रतिनिधींचा सल्लाही घेणार आहोत,’’ असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘अन्य खेळातही असे प्रकार घडले नसतील, याची हमी कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात असे कृत्य वारंवार घडू नये, यासाठी कठोर कायदा राबवण्याची नितांत गरज आहे. ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, याविषयी मी भाष्य करणार नाही. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.’’