त्याच्या पायाच्या बोटांमध्ये प्लॅटिनमची कृत्रिम नखे बसवण्यात आली आहेत.. त्याच्या गोलंदाजीचा रन-अप छोटा झाला आहे.. १४ महिने तो क्रिकेटपासून दूर होता.. असे सगळे असूनही माझ्यात अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचा विश्वास वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने व्यक्त केला.
आफ्रिकेचा गोलंदाज आंद्रे नेलच्या चित्रविचित्र हरकतींना नृत्याद्वारे वेडावून दाखवणारा श्रीशांत, तर हरभजन सिंगने थप्पड मारल्यावर ओक्साबोक्सी रडणारा श्रीशांत. क्रिकेटपेक्षा भलत्याच गोष्टींसाठी प्रसिद्धीत येणारा श्रीशांत आपल्याला परिचित होता. मात्र पायाच्या दुखापतीमुळे त्याची कारकीर्दच धोक्यात आली होती..
शस्त्रक्रिया, व्हीलचेअर, औषधे या सगळ्यांवर मात करत श्रीशांतने यंदाच्या रणजी हंगामात केरळसाठी खेळताना पुनरागमन केले. धावा रोखण्याबरोबरच विकेट्स पटकावत श्रीशांतने राष्ट्रीय संघातील स्थानासाठी आपली दावेदारी सिद्ध केली.
‘माझा २६ पावलांचा रनअप २३ पावलांचा झाला आहे. माझा वेग कमी झालेला नाही, आता मला सातत्य राखायचे आहे’, असे श्रीशांतने सांगितले. ही माझ्यासाठी नव्याने सुरुवात आहे.
केरळ, भारत अ किंवा भारतीय संघ- कोणत्याही संघासाठी खेळताना मला मनमुराद आनंद लुटायचा आहे. आयुष्यात चढउतार येतात, त्यामुळे संधी मिळताच १०० टक्के योगदान देणे हे माझे उद्दिष्ट असल्याचे तो पुढे सांगतो.
दोन महिन्यांसाठी व्हीलचेअरवर असताना अनेकदा मला अश्रू अनावर झाले. मी पुन्हा कधीच क्रिकेट खेळू शकणार नाही, असा विचार माझ्या मनात यायचा. ते १४ महिने माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट कालखंड होता.बीसीसीआय, केरळ क्रिकेट असोसिएशन आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांनी मला पाठिंबा दिला आणि म्हणूनच मी पुन्हा क्रिकेट खेळू शकलो, असे श्रीशांतने सांगितले.
नवी दिल्लीतील पालम मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारत ‘अ’ संघातर्फे श्रीशांत खेळणार आहे.