भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन गेल्या काही वर्षांपासून कसोटी संघातून बाहेर फेकला गेला आहे. भारतीय संघाकडून ३४ कसोटी सामने खेळलेल्या शिखर धवनला सध्या संघात जागा मिळत नाहीये. २०१८ साली त्याने आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. परंतू असं असलं तरीही शिखरने अद्याप कसोटी संघात पुनरागमनाची आशा सोडलेली नाही.

“मी सध्या भारतीय कसोटी संघाचा सदस्य नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की कसोटी संघात पुनरागमन करण्याची आशाच सोडून दिली आहे. ज्यावेळी मला संधी मिळते तिकडे मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्या हंगामात रणजी क्रिकेटमध्ये खेळत असतानाही मी शतक झळकावलं. यानंतर मला वन-डे संघात स्थान मिळालं. त्यामुळे जर मला अजुनही कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता असेल तर मी प्रयत्न करत रहायचं का सोडू??” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवन बोलत होता.

कसोटी पदार्पणात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. मात्र रोहित शर्मा, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल यासारख्या खेळाडूंमुळे शिखर शर्यतीत मागे पडला आहे. पण चांगली कामगिरी करत राहिलो तर कसोटी संघात स्थान मिळण्याबाबत शिखर आशावादी आहे. ३४ कसोटी सामने खेळलेल्या शिखर धवनच्या नावावर २ हजार ३१५ धावा जमा आहेत. सध्या शिखर आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.