आगामी वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेसाठी भारतीय हॉकीसंघाची आज घोषणा करण्यात आली. १८ जणांच्या भारतीय संघात हॉकी इंडियाने, भारताचा माजी कर्णधार सरदार सिंहला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तब्बल ६ महिन्यांनी दुखापतीवर मात करत, भारतीय संघाचा हक्काचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंहने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. एप्रिल-मे कालावधीत पार पडलेल्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत रुपिंदरपाल आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र यानंतर मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे रुपिंदरपाल सहा महिने संघाच्या बाहेर फेकला गेला.

अवश्य वाचा – वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड, सरदार सिंहला वगळलं

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, रुपिंदरपालने आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. “दुखापतींचा काळ हा माझ्या कारकिर्दीतला सर्वात कठीण काळ होता असं मी मानतो. ही दुखापत काहीकेल्या बरी होत नसल्याने हा कालावधी माझ्यासाठी अत्यंत निराशाजनक होता. पण यावर मात करुन मी संघात पुनरागमन करेन असा मला आत्मविश्वास होता. अशा प्रसंगामध्ये मला शांत राहण्याची गरज होती. देवाच्या कृपेने माझा परिवार, माझे मित्र आणि संघातले सहकारी यांनी मला खूप पाठींबा दिला. त्यांच्या पाठींब्याच्या जोरावरच मी संघात पुनरागमन करु शकलो.”

भारतीय संघाचा ड्रॅगफ्लिकर म्हणून ओळखला जाणार रुपिंदरपालसाठी ही नवीन सुरुवात असणार आहे. मात्र वर्ल्ड हॉकीलीग सारख्या स्पर्धेत उतरुन चांगली कामगिरी करुन दाखवणं ही सोपी गोष्ट नसल्याचं, रुपिंदरपालने मान्य केलं. मात्र जोपर्यंत मैदानात तुमचा कस लागत नाही, तोपर्यंत तुमच्या खेळात सुधारणा होत नाही. रुपिंदरच्या अनुपस्थितीत भारताचा युवा खेळाडू हरमनप्रित सिंहने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिकींग सेक्शनची जबाबदारी सांभाळली. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये पेनल्टी कॉर्नवर मिळालेल्या संघीचं गोलमध्ये रुपांतर करण भारताला जमलेलं नाहीये, त्यामुळे रुपिंदरपालचं संघात पुनरागमनही भारतीय संघासाठी एक सकारात्मक बाब मानली जात आहे.