महान फिरकीपटू शेन वॉर्नचा पलटवार
नवी दिल्ली : जवळपास आठ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर माझ्या स्वप्नात येऊन माझ्या गोलंदाजीची धुलाई करायचा, अशा प्रकारची सर्व विधाने खोटी असल्याची कबुली देणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महान फिरकीपटू शेन वॉर्नने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराऐवजी सचिनलाच प्रथम पसंती दर्शवली आहे. कारकीर्दीत या दोघांपैकी कोणत्याही एका फलंदाजाला आयुष्यभरासाठी फलंदाजीसाठी पाठवायचे असल्यास सर्वप्रथम आपण सचिनचीच निवड करू, असा पलटवार वॉर्नने केला आहे.
‘नो स्पिन’ नामक आपल्या आत्मचरित्रासंदर्भातील एका कार्यक्रमात ४९ वर्षीय वॉर्नने त्याचे मत मांडले. तो म्हणाला, ‘‘सचिन आणि लारा यांची तुलना होणे शक्य नाही. ते दोघेही माझ्या काळातील सवरेत्कृष्ट फलंदाज होते. कसोटीच्या अखेरच्या दिवशी एखाद्या फलंदाजाकडून जर मला शतक हवे असेल, तर मी नक्कीच लाराला फलंदाजीसाठी पाठवेन. मात्र कुणा एकाला मला आयुष्यभरासाठी फलंदाजीला धाडायचे झाल्यास मी निर्विवादपणे सचिनची निवड करीन.’’
सचिनने ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर नेहमीच सर्वाधिक धावा केल्या असून १९९८ मध्ये त्याने शारजा येथे साकारलेली खेळी वॉर्नला आजही लक्षात आहे. या खेळीनंतरच वॉर्नने सचिन आपल्या स्वप्नात येतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र २०१० मध्ये त्याने हे सर्व हास्यास्पद होते असे म्हटले. त्यामुळे वॉर्नच्या वक्तव्यावर सहज भरवसा ठेवणे कोणालाही कठीणच वाटते.
वॉर्नच्या आत्मचरित्रात त्याच्या वैयक्तिक जीवनाचा उलगडा केला असून भारतातील सुमार कामगिरीचेही विश्लेषण केले आहे.
First Published on October 11, 2018 3:44 am