विराट कोहलीच्या मैदानातील आक्रमक वृत्तीबाबत बोलताना भारतीय संघाचे नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक अनिक कुंबळे यांनी कोहलीच्या स्वभावाची पाठराखण केली आहे. विराटचा आक्रमकपणा मला आवडतो, तो उत्तम खेळाडू आहे, असे अनिल कुंबळे यांनी म्हटले आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱयासाठी बुधवारी रवाना होणार आहे. त्याआधी आज संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिक कुंबळे यांनी पत्रकार परिषदेत दौऱयात संघाच्या भूमिकेविषयीची माहिती माध्यमांना दिली. विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीची क्रीकेट वर्तुळात नेहमी चर्चेचा विषय ठरते. पत्रकार परिषदेत विराटच्या आक्रमकपणाबाबत कुंबळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना कुंबळे म्हणाले की, विराटचा आक्रमकपणा मला आवडतो. मी देखील आक्रमकपणेच खेळत असे. माझ्याही स्वभावात आक्रमकपणा होता. त्यामुळे कोणत्याही खेळाडूच्या नैसर्गिक प्रवृत्तीवर मी बंधनं घालू इच्छित नाही. आपण एका देशाचे नेतृत्त्व करत असून, संघातील प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे.
दुसऱयाबाजूला विराट कोहली याने वेस्ट इंडिज दौऱयासाठी उत्सुक असल्याचे प्रतिक्रिया दिली. आमच्यात काही उणीवा आहेत की ज्या सुधारण्याची गरज आहे. आपल्यातील कोणत्या गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टींची जाणीव संघातील प्रत्येकाला असल्याचे कोहली म्हणाला. संघाची फलंदाजी भक्कम आहे, पण भक्कम भागीदारी उभारण्यावर आम्हाला भर देण्याची गरज आहे. केवळ मैदानातच नाही, तर आमच्या तयारीत देखील आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची नितांत गरज आहे. कोणताही संघ गुणतालिकेतील क्रमवारीसाठी खेळतो असे मला वाटत नाही, केवळ सर्वोत्तम क्रिकेट खेळावे हाच प्रत्येकाचा उद्देश असतो, असेही कोहली पुढे म्हणाला.