मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये केव्हाही खेळाला कलाटणी मिळू शकते. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार ठरवणे कठीण आहे, असे पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी सांगितले.

या स्पर्धेत पाकिस्तानला सलामीच्याच लढतीत बांगलादेशबरोबर खेळावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. युनूस म्हणाले, ‘‘ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या तीन आठवडय़ांच्या कालावधीत सर्वोत्तम व सातत्यपूर्ण कामगिरी केली तर निश्चितच विजेतेपद मिळवता येते. त्यामुळे मी कोणत्याही संघाला विजेतेपदाचा दावेदार मानत नाही. या स्पर्धेचा इतिहास पाहता कोणताही विजेतेपदाचा दावेदार मानला गेलेल्या संघाला अजिंक्यपद मिळवता आलेले नाही.’’

बांगलादेशविरुद्धच्या लढतीविषयी युनूस म्हणाले, ‘‘बांगलादेशचे खेळाडू सध्या अतिशय अव्वल दर्जाचा खेळ करीत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये खेळाच्या प्रत्येक आघाडीवर त्यांनी चांगली प्रगती केली आहे. बांगलादेशसाठी व सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी ही अतिशय समाधानाचीच गोष्ट आहे. त्यांच्याविरुद्ध आम्हाला फाजील आत्मविश्वास बाळगून खेळणे धोकादायक ठरेल. सर्वोच्च कौशल्य दाखवीतच आम्हाला या सामन्यात खेळावे लागणार आहे. आम्हाला बांगलादेशच्या खेळाडूंबाबत खूप आदर आहे. मात्र विश्वचषक स्पर्धा ही मोठय़ा स्वरूपाची स्पर्धा आहे व तेथे आम्ही विजय मिळविण्यासाठीच खेळणार आहोत.’’

‘भेदक व अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्या मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान, वहाब रियाझ व मोहम्मद सामी यांच्यावर पाकिस्तानच्या गोलंदाजीची भिस्त आहे. त्यांच्याविषयी युनूस म्हणाले, ‘‘या गोलंदाजांकडून आम्हाला प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. अर्थात आम्ही तीन द्रुतगती गोलंदाज खेळविण्याची शक्यता आहे. ते आम्हाला अपेक्षित यश मिळवून देतील. येथील खेळपट्टय़ांवर १९० ते २०० धावा निघू शकतील. असे असले तरी आमचे गोलंदाज या खेळपट्टय़ांवरही भेदक गोलंदाजी करू शकतात. संघातील कमकुवतपणा दूर करण्यावर भर दिला आहे. आशिया चषक स्पर्धेतील पराभवापासून आम्ही बोध घेतला आहे. बांगलादेशमधील खेळपट्टय़ांपेक्षा येथील खेळपट्टय़ा थोडय़ाशा वेगळ्या आहेत व आमच्या खेळाडूंना त्या अनुकूलच आहेत.’’

विजेतेपदासाठी भारतच दावेदार – युसूफ

‘‘भारतीय खेळाडूंची सर्व आघाडय़ांवरील कामगिरी पाहता आगामी विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या विजेतेपदासाठीच तेच मुख्य दावेदार आहेत. भारतीय संघात शेवटच्या फळीपर्यंत फलंदाजी आहे व गोलंदाजीबाबतही त्यांच्याकडे विविधता आहे. स्थानिक वातावरण, अनुकूल खेळपट्टय़ा व प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा त्यांना मिळणार आहे,’’ असे पाकिस्तानचे माजी कर्णधार मोहम्मद युसूफ यांनी सांगितले.