शिखर धवनने २००४मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण तेव्हापासूनच सातत्याचा अभाव त्याच्या फलंदाजीत नेहमीच दिसत होता. आता भारताच्या कसोटी संघात धवनला सामील करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर ही संधी गमवायची नाही, असा निर्धार या डावखुऱ्या दिल्लीकर खेळाडूने केला आहे.
‘‘गेल्या वर्षी मी वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु भारतीय संघातील स्थान टिकविण्यात मी अपयशी ठरलो होतो. पण यासाठी मी कुणालाही जबाबदार धरणार नाही.
माझी कामगिरी सातत्यपूर्ण नव्हती. त्यामुळेच मी पाच एकदिवसीय सामन्यांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो नव्हतो. परंतु आता मिळालेली संधी मी गमावणार नाही,’’ असे २७ वर्षीय धवन म्हणाला. वेस्ट इंडिज दौऱ्यावरील पाच एकदिवसीय सामन्यांत धवनने एकंदर ६९ धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता.
‘‘वेस्ट इंडिजमध्ये कामगिरी चांगली झाली नाही, यासाठी मी कोणतीही कारणे सांगणार नाही. परंतु तेथील खेळपट्टय़ा अतिश धिम्या होत्या. चेंडू बॅटवर अजिबात येत नव्हता. मी अधिक धावा काढायला हव्या होत्या,’’ असे धवनने सांगितले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धवनने ८१ सामन्यांत ५६७९ धावा केल्या आहेत. याचप्रमाणे यंदाच्या हंगामात त्याने चार शतकांसह ८३३ धावा केल्या आहेत.
‘‘इराणी करंडक सामन्यात खेळलो, तेव्हा आपली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होऊ शकते, असे अजिबात वाटले नव्हते. परंतु या आधीच्या काही सामन्यांत हा विचार बऱ्याचदा डोकावला होता,’’ असे तो पुढे म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात साकारलेल्या नाबाद शतकाची निवडीसाठी मला मदत झाली, असे त्याने सांगितले.