विंडीजविरुद्धची कसोटी मालिका आटोपल्यानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे, स्थानिक क्रिकेटकडे वळला. मुंबईकडून विजय हजारे करंडक स्पर्धेत सहभागी होऊन अजिंक्यने मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं. गेल्या काही महिन्यांपासून अजिंक्य रहाणेला वन-डे संघात जागा मिळाली नाहीये, त्यामुळे आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान पक्क करण्यासाठी अजिंक्यला सर्वोत्तम कामगिरीची गरज आहे. सध्या देवधर चषकात अजिंक्यकडे भारत क संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तुम्ही जेव्हा स्थानिक क्रिकेटमध्ये येता, तेव्हा तुम्हाला त्याच जोशाने मैदानात उतरावं लागतं. मी स्वतःला अजुनही एक विद्यार्थी मानतो. मैदानात असताना प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन गोष्टी शिकवून जातो. ज्या जोशात मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळतो, मुंबईकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतानाही तोच जोश माझ्यात असतो. यामुळे संघाला विजय मिळवून देणं शक्य होतं.” देवधर चषकातील भारत ब विरुद्धच्या सामन्याआधी अजिंक्य पत्रकारांशी संवाद साधत होता.

अवश्य वाचा – मुंबईकर शार्दूल ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार

विंडीजविरुद्धची वन-डे व टी-20 मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी अजिंक्यची संघातली निवड पक्की मानली जात आहे. मात्र आगामी विश्वचषक व इतर दौऱ्यांचा विचार केला असता वन-डे संघात आपली जागा पक्की करण्यासाठी अजिंक्यला स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिल्या वन-डे सामन्यात झालेले हे 13 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?