IPL स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा भोगत असलेला श्रीसंत हा गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस या रिऍलिटी शो मुळे चर्चेत आहे. या शो दरम्यान होणारे वाद आणि इतर काही गोष्टींमुळे तो बऱ्यापैकी प्रसिद्धीझोतात आला आहे. पण या दरम्यान आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत एक मोठी गोष्ट त्याने उघड केली. नुकताच क्रिकेटमधून निवृत्त झालेला मुनाफ पटेल याच्यामुळे मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची ऊर्जा मिळाली, असे त्याने सांगितले.

‘बिग बॉस’च्या घरात आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना त्याने आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गॉडफादर कोण याबाबत सांगितले. तो म्हणाला की भारताचा माजी गोलंदाज मुनाफ हा त्यावेळी नसता, तर कदाचित मी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो नसतो.

मुनाफकडून गोलंदाजीचे धडे घेताना श्रीसंत

 

‘२००४ साली मला केरळच्या रणजी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यावेळी मी अत्यंत हताश झाला होतो आणि क्रिकेट सोडून द्यावे असा निर्णयही घेतला होता. त्यावेळी मुनाफने मला समजावलं आणि माझ्यात पुन्हा विश्वास निर्माण केला. त्यानंतर लगेचच मी भारताकडून पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलो’, असे श्रीसंतने सांगितले.

२०११ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत श्रीसंत आणि मुनाफ दोघेही भारतीय संघात होते. भारताने हा विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, मुनाफने नुकताच सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. दुबईत होणाऱ्या टी-10 लीगमध्ये मुनाफ सहभागी होणार आहे, त्याआधी मुनाफने निवृत्तीची घोषणा केली. फिटनेसच्या कारणांमुळे मुनाफ आपलं संघातलं स्थान राखू शकला नव्हता.अखेर वयाच्या पस्तीशीत प्रवेश केल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.