“तू आत्ता निवृत्त नाही होऊ शकत. लवकरच भारत पाकिस्तान मालिका होणार असून मला भारतात भारताला हरवायचं आहे. आणि त्या संघात तू नसशील तर त्याला काही अर्थ नाही असं मला इम्रान खाननं सांगितलं होतं,” असं म्हणत सुनील गावसकरांनी जुनी आठवण एका इंग्रजी वृत्तपत्राच्या स्तंभात मांडली आहे. आज इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेत असून सुनील गावसकरांनी त्याच्या काही आठवणी जागवल्या आहेत.

“मला भारताच्या इंग्लंडच्या दौऱ्यानंतर निवृत्त व्हायचं होतं. परंतु इम्राननं ते आव्हान दिलं आणि खरोखरच नंतर पाकिस्तानचा भारत दौरा जाहीर झाला. पाकिस्ताननं त्याआधी भारताला कधी भारतात हरवलं नव्हतं. त्या दौऱ्यामध्ये आधीचे सगळे सामने पावसात वाहून गेले. परंतु शेवटच्या सामन्यात खरोखरच पाकिताननं भारताला हरवलं. पाकिस्ताननं प्रथमच १९८६-८७ मध्ये भारतात मालिका जिंकली,” गावसकर लिहितात.

आपली इम्रानशी पहिली गाठ १९७१ मध्ये पडली ज्यावेळी तो इंग्लंडच्या वॉर्विकशायर काउंटीमधून खेळायचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तो मध्यम गतीचा गोलंदाज होता परंतु त्याचं चेंडूवर नियंत्रण नव्हतं, असं गावसकरांनी म्हटलं आहे. अर्थात, सात वर्षांनी जेव्हा पण बघितलं तेव्हा तो चांगलाच जलदगती गोलंदाज होता आणि त्यानं स्विंग गोलंदाजीवरही हुकूमत मिळवली होती असं गावसकरांनी म्हटलं आहे.

१९८२-८३ मध्ये इम्रान खाननं एकहाती भारतीय फलंदाजांची वाताहत केल्याची आठवण सांगताना गावसकरांनी त्यानं एकट्यानं ४० गडी बाद केल्याची माहिती दिली आहे. तसेच हे सुरू असताना भारताच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाची कारकिर्दही संपुष्टात आल्याचा दाखला त्यांनी दिला. इम्रानचा ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू गुंडप्पा विश्वनाथनं सोडून दिला, परंतु तो इनस्विंग होऊन इतका आत आला की त्यानं जवळपास विशीचा लेगस्टंप उडवला असं सांगत तिथंच विश्वनाथचं करीअर संपल्याचं गावसकर सांगतात.