विडिंजबरोबर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविंद्र जाडेजाने दुसऱ्या दिवशी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना जाडेजाने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जाडेजा म्हणाला, फलंदाजी करताना माझं सर्व लक्ष भागिदारी करण्यावर लक्ष होतं. फलंदाजीवेळी मी थोडा घाबरलो होतो पण माझं १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत होतो.

पंत बाद झाल्यानंतर इशांत शर्मासोबत झालेली भागिदारी महत्वाची ठरली. आम्ही आठव्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळी करणारा जाडेजा म्हणाला की, कर्णधार विराट कोहलीचा विश्वास मी सार्थ ठरवला आहे. ज्यावेळी कर्णधार तुम्हाला ११ मध्ये संधी देतो, त्यावेळी तो तुमच्याकडे मुख्य खेळाडू म्हणून पाहत असतो. मी चांगली प्रदर्शन करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आहे. यापुढेही कर्णधाराचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

जाडेजाला पहिल्या कसोटीत अश्विवऐवजी संघात स्थान दिल्यानंतर क्रीडा विश्वातून विराट कोहलीवर टीका झाली होती. अनेक माजी खेळाडूंनी विराटच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, जाडेजाने आपल्या अष्टपैलू खेळीने टीकाकारांना प्रतिउत्तर दिले आहे.

जाडेजाने दुसऱ्या दिवशी तळाच्या फलंदाजांच्या साथीने ९४ धावा जोडल्या. जाडेजाच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर संघाची धावसंख्या सन्माजनक झाली. जाडेजाने गोलंदाजी करताना एक बळीही घेतला आहे.

दुसऱ्या दिवसाखेर विडिंजने आठ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या आहेत. भारताकडे अद्याप १०८ धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी विडिंजच्या फलंदाजांना लवकर गुंडाळून सामन्यावर पकड मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.