विराट कोहलीची क्रिकेटविषयक असलेली आवड पाहून दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना त्याच्यात मला दिसतो, असे उद्गार भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काढले.
‘‘मॅराडोना हा माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे आणि प्रत्येक वेळी त्याला फुटबॉल खेळताना पाहतो, त्यावेळी तो या खेळावर हृदयापासून प्रेम करत असल्याचे जाणवते. विराटला पाहतानाही तसेच वाटते. त्याची देहबोली मला प्रभावीत करते. मी त्याचा चाहता बनलो आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.
‘‘मैदानाबाहेरही विराट पसंतीत उतरतो. विराटवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. मैदानावर आणि टीव्हीवर त्यामध्ये जे काही पाहायला मिळते, त्यामुळे खूप आत्मविश्वास मिळतो,’’ असे मत गांगुलीने व्यक्त केले. कर्णधार म्हणून कोहलीने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध चौथे शतक झळकावले. कर्णधारपदाच्या पहिल्याच परीक्षेत म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने अॅडलेड कसोटीत दोन, तर सिडनी कसोटीत एक शतक झळकावले होते. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यामुळे कोहलीवर जबाबदारी सोपवण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 14, 2015 5:59 am