तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदे, उबेर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळून दोन कांस्यपदके अशा पदकदायी प्रदर्शनाने सायना नेहवाल खूश नाही. यंदाच्या वर्षांत मी आणखी जेतेपदे मिळवू शकले असते, असे सायनाने म्हटले आहे.
२०१३ वर्षांत दुखापती आणि ढासळलेल्या फॉर्ममुळे सायनाला एकही जेतेपद पटकावता आले नव्हते, मात्र जिद्दीने खेळ करत सायनाने शानदार पुनरागमन केले. जानेवारीत लखनौ येथे झालेल्या इंडिया ओपन ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावत सायनाने जेतेपदांचा दुष्काळ संपवला.
जून महिन्यात ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई करत सायनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकवार आपला ठसा उमटवला. २४ वर्षीय सायनाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने उबेर चषकात तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकावर कब्जा केला. वर्षअखेरीस झालेल्या चीन सुपर सीरिज स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत सायनाने इतिहास घडवला.
कोणत्याही खेळाडूसाठी यश-जेतेपद मिळवणे सर्वोत्तम उद्दिष्ट असते. २०१३ च्या तुलनेत यंदा मी चांगली कामगिरी केली, मात्र आणखी जेतेपदे मिळवू शकले असते, असे सायनाने स्पष्ट केले. या वर्षी झालेल्या चुका टाळत पुढच्या वर्षी आणखी जेतेपदे पटकावण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.
नियमित प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याच्या निर्णयाने उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. त्याबाबत विचारले असता, ‘‘कामगिरीत सुधारणा होण्याच्या दृष्टीनेच मी हा निर्णय घेतला. खेळाचा वेग, वैविध्य, तंत्र आणि तंदुरुस्ती या मुद्दय़ांवर मी भर देत आहे. विमल सरांच्या मार्गदर्शनाचा मला फायदाच झाला आहे.’’
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायना आता वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत खेळणार आहे. ‘‘या स्पर्धेसाठी कसून मेहनत केली आहे. जगातील आठ अव्वल खेळाडूंदरम्यान मुकाबला असतो. या स्पर्धेतील कामगिरी सुधारायची आहे,’’ असे तिने सांगितले.