X

Asia Cup 2018 : मी DRS चा निर्णय घ्यायला नको होता – लोकेश राहुल

तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही राहुल बाद असल्याचं उघड

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं. विजयासाठी अफगाणिस्तानने दिलेल्या २५३ धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि अंबाती रायडू या सलामीवीरांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र राशिद खानच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल पायचीत असल्याचं अपील अफगाणी गोलंदाजांनी केलं. पंचांनीही राशिद खानचं हे अपील मान्य करत लोकेश राहुलला बाद ठरवलं. मात्र लोकेश राहुलने या निर्णयाला DRS चा निर्णय घेऊन आव्हान दिलं. यावेळी तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही लोकेश राहुल बाद असल्य़ाचं सिद्ध झाल्यामुळे भारताने आपला रिव्ह्यू गमावला. यानंतर धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांनी वादग्रस्त निर्णय देऊन बाद ठरवलं, मात्र यावेळी भारताच्या हातात रिव्ह्यू नसल्यामुळे या निर्णयाला आव्हान देणं शक्य झालं नाही.

“सामना संपल्यानंतर मी त्या गोष्टीकडे पाहिल्यावर नक्कीच जाणवतं की मी तो रिव्ह्यू घ्यायला नको होता. चेंडू यष्टीच्या बाहेर जाईल असा माझा अंदाज होता, त्यामुळे मला एक संधी घ्यायची होती. मात्र दुर्दैवाने तो निर्णयही माझ्याविरोधात गेला. हा रिव्ह्य़ू माझ्या इतर सहकाऱ्यांच्या कामी आला असता असंही मला वाटलं, पण त्यावेळी मी लावलेला अंदाज पूर्णपणे चुकल्यामुळे यावर आता फारसं बोलणं योग्य ठरणार नाही.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलने आपली बाजू मांडली.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात ९ विक्रमांची नोंद, धोनीच्या नावावर ३ विक्रम

अफगाणिस्तानच्या खेळाचंही राहुलने कौतुक केलं. यापुढे अफगाणिस्तानला हलकं लेखण्याची चूक कोणालाच करता येणार नाही. वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये ते आता एका तुल्यबळ संघाप्रमाणे खेळत आहेत. एक खेळाडू म्हणून अशा रंगतदार सामन्यांमध्ये तुम्ही खेळलात याचंही तुम्हाला समाधान मिळतं. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात जो संघ विजयी होईल त्याचा सामना अंतिम फेरीत भारताशी होणार आहे.

  • Tags: Ind vs AFG, lokesh-rahul, आशिया कप - 2018,