ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने भारतीय संघाविरुद्ध खेळतानाच्या अनुभवाचे कथन केले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रिकी पॉन्टिंगने खास भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याचा उल्लेख केला. तो म्हणाला की, भारतीय संघातील हरभजन सिंग हा माझा सर्वात मोठा शत्रू होता. त्याची आजही मला भीतीदायक स्वप्ने पडतात.

रिकी पॉन्टिंग याला कसोटी क्रिकेटमध्ये हरभजनने सर्वाधिक १० वेळा बाद केले आहे. यात तीनवेळा पॉन्टिंगला भज्जीने शून्यावर माघारी धाडले आहे. रिकी पॉन्टिंगने कसोटी क्रिकेटमध्ये ५१.८५ सरासरीने धावा केल्या आहेत. पण भारताविरुद्ध खेळताना त्याची सरासरी थेट २२.३० अशी खालावती राहिली आहे.

भारतीय संघाविरुद्ध खेळताना मला नेहमी हरभजनची भीती वाटायची. तो मला बाद करेल अशी धास्ती मनात नेहमी असायची. अगदी आजही मला हरभजनची भीतीदायक स्वप्ने पडतात, असे पॉन्टिंग म्हणाला.
हरभजनने पॉन्टिंगचीच विकेट घेऊन आपल्या कसोटी कारकीर्दीतील ३०० बळींचा टप्पा गाठला होता. पॉन्टिंग आणि हरभजनचे द्वंद नेहमी चुरशीचे ठरायचे. पॉन्टिंगने आपल्या कसोटी कारकीर्दीत १६८ कसोटी सामन्यांत १३३७८ धावा केल्या आहेत. तर ३७५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३७०४ धावा जमा आहेत.