मारिन चिलीच, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, ग्रिगोर दिमित्रोव्ह यांच्यासह अनेक युवा खेळाडू ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र तूर्तास तरी रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या त्रिकुटाची सद्दी कायम राहील, असे मत १४ ग्रँड स्लॅम विजेता महान खेळाडू पीट सॅम्प्रसने व्यक्त केले.  ‘‘अथक परिश्रम, सातत्याने खेळात सुधारणा, प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास आणि विविध परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी यांच्या बळावर हे त्रिकूट टेनिस विश्वावर अधिराज्य गाजवते आहे. उदयोन्मुख खेळाडू गुणवान आहेत, मात्र त्रिकुटाच्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल,’’ असे सॅम्प्रसने सांगितले.
‘‘भारतातील चाहत्यांचे प्रेम व उत्साह थक्क करणारे आहे. मी खेळातून निवृत्ती घेऊन आता अनेक वर्षे झाली आहेत, मात्र तरीही ते मला भेटण्यासाठी आतुर होते. पुन्हा भारतात यायला आवडेल,’’ अशा शब्दांत सॅम्प्रसने भारत दौऱ्यातील अनुभव कथन केला.