प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात कधी ना कधी असे दिवस येतात की त्यावेळी त्याला सर्व काही सोडून द्यावसं वाटतं. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीलाही काही दिवसांपूर्वी अशाच एका समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. शमीची पत्नी हसीन जहानने त्याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बीसीसीआयने काही दिवसांसाठी शमीचा करारही रोखून ठेवला होता. मात्र केवळ घरच्यांच्या पाठींब्याच्या जोरावर आपण यातून बाहेर येऊ शकलो, त्यावेळी आपल्या मनात एकदा नव्हे तर तीन वेळा आत्महत्येचा विचारही आल्याची कबुली मोहम्मद शमीने दिली.

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासोबत मोहम्मद शमीने इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारल्या. यादरम्यान २०१५ विश्वचषकादरम्यान झालेली दुखापत, पत्नी हसीन जहानसोबत झालेला वाद यावर शमीने आपल्या भावना बोलून दाखवल्या. “२०१५ विश्वचषकादरम्यान मला दुखापत झाली होती, त्यामधून सावरायला मला किमान १८ महिन्याचा कालावधी लागला होता. माझ्यासाठी आयुष्यातला तो सर्वात खडतर काळ होता. ज्यावेळी मी पुन्हा खेळण्यास सुरुवात केली, त्यावेळी मला काही वैय्यक्तिक आयुष्यातील प्रॉब्लेमसचा सामना करावा लागला. मात्र या काळात माझ्या परिवाराने मला पाठींबा दिला. जर त्यांचा पाठींबा नसता तर मी पुन्हा उभं राहू शकलो नसतो. त्यावेळी माझ्या मनात तीनवेळा आत्महत्येचा विचारही आला होता.”

त्या काळात परिवारातला कोणता न कोणता सदस्य माझ्यासोबत २४ तास असायचा. तुमचा परिवार तुमच्यासोबत असेल तर तुम्ही काहीही करु शकता हे मला त्या दिवसांमध्ये कळलं. जर माझा परिवार त्याक्षणी माझ्यासोबत नसता तर कदाचित मी काहीतरी करुन बसलो असतो. यासाठी मी माझ्या परिवाराचा कायम ऋणी राहीन, शमीने रोहितशी बोलताना आपल्या भावना बोलून दाखवल्या. पुनरागमन केल्यानंतर शमीने भारतीय संघात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. भारतीय संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही तो सहभागी झाला होता. आयपीएलमध्ये शमी किंग्ज इलेव्हन पंजाबचं प्रतिनिधीत्व करतो, परंतु देशभरात पसरलेल्या करोना विषाणूमुळे यंदाचं आयपीएल बीसीसीआयने अनिश्चीत काळासाठी स्थगित केलं आहे.