भारतीय कसोटी संघात राखीव यष्टीरक्षकाची भूमिका बजावणाऱ्या पार्थिव पटेलसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा काहीसा खडतरच गेला. पहिल्या कसोटीनंतर दुखापतग्रस्त वृद्धीमान साहाच्या जागी पार्थिवला संघात जागा देण्यात आली. मात्र या दौऱ्यात त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. मात्र पार्थिव अजुनही आफ्रिकेतल्या आपल्या कामगिरीवर समाधानी आहे.

अवश्य वाचा – ३ सामन्यांनंतर माझी कामगिरी कधी जोखणार? पत्रकारांच्या प्रश्नाला रोहितचं खोचक उत्तर

“माझ्या मते आफ्रिकेत मी माझ्याकडून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. जोहान्सबर्गसारख्या खेळपट्टीवर जिथे चेंडू कधी उसळी घेत होता तर कधी खाली बसत होता, तिकडेही मी चांगलं यष्टीरक्षण केलं. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी डावाची सुरुवातही केली. त्यामुळे मिळालेल्या संधीचं माझ्याकडून मी सोनं करण्याचा प्रयत्न केला.” टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पार्थिव पटेल बोलत होता.

कसोटी सामन्यात पार्थिव पटेलकडून यष्टीरक्षणादरम्यान काही संधी हुकल्या. याबद्दल विचारलं असताना पार्थिव म्हणाला, “तुम्ही त्या संधी पुन्हा एकदा नीट पाहिल्या असतील तर एक गोष्ट लक्षात येईल की, ते झेल अतिशय अवघड होते. मी ते झेल पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण मला त्यात अपयश आलं. मात्र यावरुन कोणत्याही सहकाऱ्याने माझ्याकडे नाराजी व्यक्त केली नाही.”

कसोटी मालिकेचा निकाल आमच्या बाजूने लागला नसेल, तरीही माझ्यामते आमच्या संघाने चांगला खेळ केला. प्रत्येक वेळा आम्ही सामना कसा जिंकता येईल याचा विचार करत होतो. आफ्रिकेतल्या भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल पार्थिव पटेल बोलत होता. दरम्यान आगामी आयपीएलमध्ये पार्थिव पटेल विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे पार्थिवच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.