आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. बेदरकार फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा सेहवाग, क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही क्रिकेटशी जोडला गेला आहे. हरयाणात आपल्या शाळेच्या माध्यमातून सेहवाग अनेक तरुण मुलांना क्रिकेटचे धडे देतो आहे. मात्र आपल्या मुलांनी आपल्यासारखं बनू नये अशी इच्छा सेहवागने व्यक्त केली आहे.

“क्रिकेटने मला सर्वकाही दिलं आहे. क्रिकेटमुळेच आतापर्यंत माझं घर चालत आलेलं आहे, त्यामुळे मी देखील समाजाला काही देणं लागतो. गरजु विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करावी अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. मुलांना एकाच छताखाली राहण्याची सोय, शिकण्याची सोय आणि खेळण्याची सोय व्हावी हा त्यांचा हेतू होता. मला कसंही करुन वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. आताही माझा बराचसा वेळ या मुलांसोबत शाळेत जातो. या माध्यमातून मी समाजाचं ऋण फेडू शकेन असं मला वाटतं.” सेहवाग Outlook मासिकाशी बोलत होता.

मात्र आपल्या मुलांनी आपल्यासारखं होऊ नये अशी इच्छाही सेहवागने व्यक्त केली. सेहवागला आर्यवीर आणि वेदांत असे दोन मुलगे आहेत. “माझ्या मुलांमध्ये मला दुसरा सेहवाग बघायचा नाहीये. त्यांनी हार्दिक पांड्या, विराट कोहली किंवा धोनीसारखं व्हावं, मात्र त्यांनी क्रिकेटपटूच व्हावं अशी माझं म्हणणं नाही. त्यांना भविष्यात जे काही कारयचं असेल ते करु शकतात.” सेहवाग आपल्या मुलांसोबत बोलत होता. सेहवाग आपल्या शाळेत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांनाही मोफत शिक्षण देतो.