भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू मनदीप सिंग याने झिम्बाब्वे दौऱयात भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पदार्पण केले होते. त्याने तीन सामन्यांत ८७ धावा ठोकल्या होत्या, यात सर्वाधिक नाबाद ५२ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत देखील त्याची निवड करण्यात आली होती. पण अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात त्याला स्थान मिळाले नव्हते. आता पुन्हा एकदा मनदीप सिंग याला इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

 

विराटच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघात यावेळी मनदीपला स्थान मिळेल अशी आशा आहे. मनदीपने स्थानिक पातळीवर पंजाब संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे, तर याआधी आयपीएलमध्ये देखील तो कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बंगळुरू संघाकडून खेळला आहे. मनदीपने ‘मिड-डे’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराटच्या नेतृत्त्व गुणांचे आणि सातत्यूपूर्ण कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला की, विराटने क्रिकेटविश्वातील फिटनेसचा आणि खेळाप्रतीच्या कटिबद्धतेचा स्तर उंचावला आहे. मला माझ्या फिटनेसचा स्तर उंचावण्याची गरज आहे. सोबतच परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कौशल्य अवगत करायले हवे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करता आली पाहिजे. विराटकडून मला कामगिरीत सातत्य कसे टिकवायचे हे शिकण्याची इच्छा आहे. ट्वेन्टी-२० सारख्या झटपट खेळात प्रत्येक चेंडूवर धावा घेण्याचे लक्ष्य आहे.

युवराज सिंगच्या पुनरागमनावरही मनदीपने आनंद व्यक्त केला. युवराज मला मोठ्या भावासारखा आहे. तो संघात स्थान मिळविण्यासाठी नक्कीच पात्र आहे.