विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावल्यानंतरही धावांची भूक थांबलेली नाही व अशी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावरच माझा भर राहील, असे भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने सांगितले.

डाव्या गुडघ्यातील स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे मंधानाला सहा महिने स्पर्धात्मक सरावापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळेच येथे सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात तिला स्थान मिळाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातही तिला सलामीला खेळवण्याचा निर्णय अनपेक्षित मानला जात होता. मात्र महाराष्ट्राच्या या २० वर्षीय खेळाडूने येथील स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध तडाखेबाज ९० धावा, तर वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०६ धावा करीत आपली निवड सार्थ ठरवली आहे.

‘‘दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर येथील यशस्वी पुनरागमनामुळे मला खूप आनंद झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात माझी फलंदाजी चांगली झाली नव्हती; परंतु विंडीजविरुद्धच्या सराव सामन्यात नाबाद ८२ धावा केल्यानंतर आत्मविश्वास वाढला. प्रत्यक्ष स्पर्धेतील खणखणीत कामगिरीनंतर आता उर्वरित सामन्यांमध्येही तशीच चमक दाखवण्याचा प्रयत्न आहे,’’ असे मंधानाने सांगितले.

मंधानाने २०१४ मध्ये भारताकडून इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमधील मैदानावरच खेळताना संघाला कसोटी विजय मिळवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्या वेळी मंधाना ही केवळ १८ वर्षांची होती.

‘‘इंग्लंडमधील वातावरण खूप आल्हाददायक आहे. येथील खेळपट्टय़ाही अव्वल दर्जाच्या व फलंदाजीस अनुकूल आहेत. त्यामुळे खेळताना खूप मजा येते. अर्थात याचा अर्थ असा नाही की, मला भारतामधील खेळपट्टय़ांवर खेळायला आवडत नाही. येथे दूरदर्शन किंवा अन्य कोणतीही मनोरंजनाची साधने नाहीत. त्याचा फायदा खेळावरच अधिकाधिक लक्ष ठेवण्यासाठी होत आहे. दुखापतीमुळे सहा महिने विश्रांती घेत असताना माझ्या खेळातील चुका कशा दूर होतील यावरच भर दिला होता. पूर्वी मी धोका पत्करून फटकेबाजी करीत असे. त्यामुळे अनेक वेळा लवकर बाद होण्याची वेळ माझ्यावर येत असे. आता आत्मविश्वासाने व निदरेष फटके मारण्यावर भर दिला आहे,’’ असे डावखुरी फलंदाज मंधानाने सांगितले.

भारताचा रविवारी पाकिस्तानशी सामना होणार आहे. या सामन्याविषयी मंधाना म्हणाली, ‘‘पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे. या स्पध्रेत आम्ही विजेतेपद मिळवण्यासाठीच खेळत आहोत.’’