मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. साखळी फेरीपासून मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का देत मिताली राजच्या टीम इंडियाने सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. यानंतर जगभरातून मितालीच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

मिताली राजने केलेल्या कामगिरीनंतर तिच्याकडून भारतीय क्रीडा रसिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुखानच्या मते, मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय पुरुष संघाला प्रशिक्षण देण्याचा विचार करावा. स्टार प्लस या वाहिनीवर टेड टॉक या शोमध्ये मितालीशी बोलत असताना शाहरुखने आपलं मत व्यक्त केलं.

शाहरुखने व्यक्त केलेल्या मतावर बोलताना मिताली राज म्हणाली, “मैदानावर असताना मी १०० टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण संघ मिळून ट्रॉफी कशी जिंकता येईल याकडे माझा भर असतो. आणीबाणीच्या प्रसंगात स्वतःला शांत ठेवण्यासाठी मी म्हणूनच पुस्तक वाचते. त्यामुळे या सर्व गोष्टी मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करत असल्याचं”, मिताली राज म्हणाली. महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (६१९०) नावावर असलेल्या मिताली राजचा यंदा आयसीसीच्या, महिलांच्या वन-डे संघात समावेश करण्यात आला होता. मिताली राज व्यतिरीक्त एकता बिश्त आणि हरमनप्रीत कौर यांनाही आयसीसीच्या वन-डे संघात स्थान मिळालं आहे.