भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, रवी शास्त्री यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्र गेली, आणि महिनाभर बीसीसीआयमध्ये सुरु असलेलं नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आलं. बीसीसीआय विरुद्ध विराट कोहली अशा निर्माण झालेल्या वादात अखेर बीसीसीआयने विराटच्या पसंतीप्रमाणे रवी शास्त्री यांची नेमणुक करुन वादावर पडदा टाकला. मात्र यावेळी भारतीय संघाचा आणखी एक माजी खेळाडू प्रशिक्षकपदासाठी उत्सुक होता अशी माहिती समोर येते आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली याने, आपल्याला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मनापासून इच्छा होती असं नुकतचं एका कार्यक्रमात कबुल केलं आहे.

“आयुष्यात तुम्हाला जी गोष्ट करता येते तीच गोष्ट करण्यावर आपण भर दिला पाहिजे. फळाची चिंता न करता आपल्या आवडीचं काम करत राहिलो तर ध्यानीमनी नसताना आपल्याला आपल्या कामाचं फळ मिळतं. १९९९ साली आमचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. यावेळी मी संघाचा उप-कर्णधारही नव्हतो. सचिन तेंडुलकर संघाचा कर्णधारह होता आणि अवघ्या ३ महिन्यांमध्ये मला संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं.”

अवश्य वाचा – गांगुलीच्या अलिशान बंगल्यात सापडल्या डेंग्युच्या अळ्या

“ज्यावेळी मी प्रशासकीय कामकाजात आलो, त्यावेळी मला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायचा होता. माझ्या मनात भारतीय संघाचा प्रशिक्षक बनावं अशी इच्छा होती. मात्र जगमोहन दालमिया यांनी मला फोन करुन, सहा महिन्यांसाठी तू काम करुन का पाहत नाहीस?? असा प्रश्न विचारला. यानंतर काही महिन्यांनी त्यांचं निधन झालं, आणि अध्यक्षपदासाठी कोणताही योग्य उमेदवार नसल्यामुळे मला अध्यक्षपद स्वीकारणं भाग होतं. या पदावर पोहचण्यासाठी लोकं २० वर्ष वाट पाहतात. मात्र नशिबाने हे पद मला अगदी सहज मिळालं.” India Today Conclave East 2017 या कार्यक्रमात बोलताना सौरव गांगुलीने आपलं मत मांडलं.

सध्या सौरव गांगुली बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणूनही काम पाहतो. सौरवसोबत सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश अससेल्या या समितीकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीची जबाबदारी आहे. चॅम्पियन्स करंडकात अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर महिन्याभराच्या नाराजीनाट्यानंतर सौरव गांगुलीच्या क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली होती.