गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने आपल्याकडे झालेल्या दुर्लक्षाविषयी नाराजीचा सूर आळवला. चांगली कामगिरी करुनही भारतीय क्रिकेट संघातून आपल्याला डावलले गेल्यामुळे त्याने एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

‘चांगली कामगिरी करुनही मला संघाबाहेर ठेवलं गेलं होतं, याचं खूप दु:ख होतं. पण, आता मात्र यो-यो चाचणीत उत्तीर्ण झाल्यामुळे माझे मनोबळ उंचावले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या मेहनतीमुळे आणि प्रशिक्षणामुळे भारतीय संघातून खेळण्याची माझी जिद्द आणि इच्छाशक्ती आणखीनच प्रबळ झाली आहे’, असं रैना ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

‘मला एवढ्यावरच थांबायचे नाहीये, मुळात मला भारतीय संघासाठी जास्तीत जास्त योगदान द्यायचे आहे. मला २०१९ च्या विश्वचषकामध्ये खेळण्याचीही इच्छा आहे. कारण, इंग्लंडमध्ये माझी कामगिरी चांगली होती हे मलाही ठाऊक आहे. एक खेळाडू म्हणून माझ्यामध्ये असून बरीच जिद्द आणि चिकाटी आहे. त्याशिवाय स्वत:च्या खेळावरही माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येत्या काळात दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात मी चांगली कामगिरी करेन’, असा विश्वास त्याने व्यक्त केला. या मुलाखतीत ३१ वर्षीय रैनाने आपल्या वयाच्या आकड्याकडे दुर्लक्ष करत वाढतं वय ही फक्त संख्या असून उत्साहाच्या आड ती कधीच येत नाही, असंही स्पष्ट केलं.

वाचा : आयपीएलमधे बोली न लागल्याने इशांत शर्मा ‘या’ संघाकडून खेळणार क्रिकेट

क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत २२३ एकदिवसीय आणि ६५ टी20 सामने खेळणाऱ्या सुरेश रैनाने त्याच्या खेळाने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रैनाने इंग्लंडच्या संघाविरोधात खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात ६३ धावांची दमदार खेळी केली होती. पण, त्यानंतर यो-यो चाचणीत तो अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघातून त्याला डावलण्यात आलं होतं. या दरम्यानच्या काळात रैनाने स्थानिक क्रिकेटच्या जगतात जास्त सामने खेळले असून स्वत:ला यो-यो चाचणीसाठी तयार करुन घेतले. या कठिण प्रसंगी त्याला कुटुंबाची साथ लाभली. ज्याबद्दल त्याने या मुलाखतीत कुटुंबियाचे आभारही मानले. रैनाची ही मुलाखत आणि त्याचा आत्मविश्वास पाहता सर्वांचेच लक्ष त्याच्या कामगिरीकडे लागून राहिले आहे.