‘‘माझ्यावर सचिनचाच प्रभाव होता. मात्र सचिनसारखा खेळाडू एकदाच घडतो. हे जाणून मी माझ्या तंत्रात आवश्यक बदल करुन स्वत:ला घडवले ’’, असे धडाकेबाज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने सांगितले. घोटीव तंत्रापेक्षा टायमिंगच्या बळावर चेंडू सीमारेषेबाहेर धाडण्याचे सेहवागचे कौशल्य वादातीत आहे. काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेल्या सेहवागने आपल्या कारकीर्दीला उजाळा दिला.
‘लहानपणी मी १० तसेच १२ षटकांचे असंख्य सामने मी खेळलो. त्या वेळी मधल्या फळीत फलंदाजीची संधी मिळत असे. अशा परिस्थितीत माझ्या वाटय़ाला केवळ दहाच चेंडू येत असत. साहजिकच प्रत्येक चेंडूवर टोलेबाजी करणे हेच माझे उद्दिष्ट असायचे. हाच दृष्टिकोन मी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कायम ठेवला. सर्व प्रकारांमध्ये ८० ते ९०चा स्ट्राइक रेटबद्दल माझे कौतुक होते. पण असा स्ट्राइक रेट असण्याचे कारण लहानपणाच्या क्रिकेटमध्ये दडले आहे,’ असे सेहवागने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘मी माझा नैसर्गिक खेळ करत असे. वेगाने धावा करायच्या आहेत किंवा वेगळ्या पद्धतीने खेळायचे आहे असे काहीच माझ्या डोक्यात नसायचे. भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली तेव्हा मला तेंडुलकरसारखेच खेळायचे होते. मात्र थोडय़ा कालावधीतच तेंडुलकर एकच असू शकतो याची मला जाणीव झाली. त्यानंतरच स्टान्स आणि बॅकलिफ्ट या मूलभूत गोष्टी बदलल्या. मी माझ्या शैलीनेच खेळू लागलो.’
चेंडूवर प्रहार करण्याची शैली आणि परिणाम यामुळे माझी तेंडुलकरशी तुलना केली जाते. मात्र तेंडुलकर एकच असू शकतो, असे सेहवागने सांगितले.
क्रिकेट संघटनांमधील अंतर्गत बंडाळ्यांविषयी विचारले असता सेहवाग म्हणाला, ‘हा प्रश्न केवळ दिल्ली क्रिकेट संघटनेपुरता मर्यादित नाही. असंख्य संघटनांमध्ये अशा स्वरूपाचे वाद सुरू आहेत.
१६ तसेच १९ वर्षांखालील पातळीवर बदल होणे अत्यावश्यक आहे. मूळ वयापेक्षा वाढीव वय असणारे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले तर समस्या वाढतात. याप्रश्नी वेळीच उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे.’
‘सेहवाग इंटरनॅशनल स्कूल ही संस्था मी सुरू केली आहे. त्यामुळे क्रिकेट संघटना किंवा निवड समिती सदस्य म्हणून मी काम करू शकत नाही. तसे केले तर परस्परविरोधी हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संघटनेतील सत्ताधीश निवड समितीला नावे सुचवतात आणि त्यानुसार संघनिवड होते,’ असा आरोपही सेहवागने केला.