भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने युवा खेळाडू शुभमन गिलवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. शुभमन गिलला नेट्समध्ये खेळताना पाहिल्यावर लक्षात आलं की आपण जेव्हा 19 वर्षांचे होतो तेव्हा आपल्याकडे त्याच्या 10 टक्केही टॅलेण्ट नव्हतं अशा शब्दांत विराटने शुभमन गिलचं कौतुक केलं आहे.

‘भारतीय क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळाडू प्रवेश करत आहेत. तुम्ही पृथ्वी शॉला पाहिलंत. त्याने वेस्ट इंडिजविरोधात मिळालेल्या संधीचं सोनं केलं. शुभमन हादेखील एक उत्तम खेळाडू आहे’, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. ‘मी शुभमनला नेट्समध्ये खेळताना पाहिलं आणि क्षणभर थांबलो आणि विचार करु लागलो की आपण 19 वर्षांचे होतो तेव्हा याच्या 10 टक्के टॅलेण्टही आपल्याकडे नव्हतं’, असं विराटने सांगितलं.

‘युवा खेळाडूंकडे प्रचंड आत्मविश्वास असून भारतीय क्रिकेटसाठी हे फायद्याचं आहे. जर भारतीय क्रिकेटचा दर्जा सुधारत राहिला आणि संघात येणाऱ्या नवीन खेळाडूंनी प्रभावी खेळ केला तर त्यांना संधी देण्यास आम्हालाही आनंद होईल’, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

शुभमनची फलंदाजी शैली अगदी विराट कोहलीसारखी असून अंडर-19 वर्ल्ड कप टीमचा तो एक भाग होता. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने 418 धावा केल्या होत्या. त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटही ठरवण्यात आलं होतं.