News Flash

ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करीन – खत्री

आगामी ऑलिम्पिकमध्ये युक्रेनच्या खेळाडूंचे प्रामुख्याने माझ्यापुढे आव्हान असणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये ग्रीकोरोमन विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणारा मल्ल रवींदर खत्री याचा नेटसर्फचे संस्थापक सुजित जैन व लक्ष्य फाऊंडेशनचे संस्थापक विशाल चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आर्थिक हलाखीच्या स्थितीमुळे माझ्या वडिलांना कुस्तीमध्ये कारकीर्द करता आली नाही, त्यांचे अपुरे स्वप्न मी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकूनच पूर्ण करणार आहे, असे भारताचा कुस्तीगीर रवींदर खत्रीने सांगितले.

खत्री हा आगामी ऑलिम्पिकमध्ये ग्रीकोरोमन विभागातील ८५ किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तो मूळचा हरयाणाचा मल्ल असून तो आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये बलवंत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याने राष्ट्रीय विजेता सोमवीर सिंग याच्यावर मात करीत ऑलिम्पिक पात्रता फेरीत स्थान मिळवले. कझाकिस्तानमध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवत ऑलिम्पिक तिकीट निश्चित केले होते.

‘‘आगामी ऑलिम्पिकमध्ये युक्रेनच्या खेळाडूंचे प्रामुख्याने माझ्यापुढे आव्हान असणार आहे. त्या दृष्टीने सरावात मी भर देणार आहे. ऑलिम्पिकपूर्वी पोलंड व अमेरिका या दोन ठिकाणी भारतीय मल्लांसाठी सराव शिबीर होणार आहे. त्याचा फायदा मला निश्चित होणार आहे. या शिबिरासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे लक्ष्य ऑलिम्पिक पदक व्यासपीठ योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य लाभले आहे,’’ असे खत्री याने सांगितले.

‘‘रवींदर हा अतिशय जिगरबाज खेळाडू आहे. सेनादलात असल्यामुळे या खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर नेहमीच भर दिला जात असतो. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये तो आत्मविश्वासाने लढत देऊ शकेल. तो किमान कांस्यपदक मिळविल अशी मला खात्री आहे,’’ असे बलवंत सिंग यांनी सांगितले. रवींदरला नेटसर्फ कंपनी व लक्ष्य फाऊंडेशन यांच्यातर्फे आर्थिक पुरस्कार देण्यात आला आहे. नेटसर्फचे संस्थापक सुजित जैन व लक्ष्य फाऊंडेशनचे संस्थापक विशाल चोरडिया यांच्या हस्ते त्याचा येथे सत्कार करण्यात आला. रवींदरचे वडील जयप्रकाश यांचा रिओ येथे जाण्यायेण्याचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलणार आहोत, असे सुजित जैन यांनी या वेळी सांगितले. लक्ष्य फाऊंडेशनचे संस्थापक व ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे हेही उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:27 am

Web Title: i will definitely win olympic medal says wrestler ravindra khatri
Next Stories
1 पुण्यास विजेतेपद मिळवून देईन – भास्करन
2 शास्त्रीसह सहयोगी प्रशिक्षकही भारताच्या प्रशिक्षकपदांसाठी अर्ज करणार
3 पारदर्शक कारभारावर भर देणार -शिर्के
Just Now!
X