भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडे डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी मनिष पांडेने लग्न केलं. मुंबईत थाटामाटात हा सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याची क्षणचित्रे सोशल मीडियावर आल्यानंतर टीम इंडिया आणि IPL मधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं. त्यावेळी मनिष पांडेचा IPLमधील सहकारी राशिद खानने याने ट्विटरवरुन मनिषचं अभिनंदन करताना, ‘मला लग्नाला का बोलावलं नाहीस??’ असा मजेत प्रश्न विचारला होता. त्याच राशिद खानने एका मुलाखतीत स्वत:च्या विवाहाबाबत माहिती दिली आहे.

राशिद खान २१ वर्षाचा हँडसम बॅचलर आहे. त्याच्या गोलंदाजीची कमाल साऱ्यांनीच पाहिली आहे. IPLमुळे राशिदच्या चाहत्यावर्गात तरूणींचीही संख्या भरपूर आहे. त्यामुळे तो आता विवाहबंधनात केव्हा अडकणार? यासंबंधीचा प्रश्न राशिद खानला आझादी रेडियोच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर, “मी आता माझ्या लग्नाचा विचार करणार नाही. अफगाणिस्तानचा संघ जेव्हा वर्ल्ड कप जिंकेल, तेव्हाच मी साखरपुडा आणि लग्न करेन”, असे झकास उत्तर राशिद खानने दिले.

राशिद खान

काही दिवसांपूर्वीच राशिद खान याच्या आईचे दीर्घ आजाराने निधन झाले. राशिदची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. पण अखेर १८ जूनला त्याच्या आईचा मृत्यू झाला. राशिद खानने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून मातृशोकाची बातमी दिली. “आई, माझ्याजवळ घर नव्हते, तेव्हा तू होतीस. तूच माझं घर होतीस. पण आता तू या जगात नाहीस याचा विश्वास बसत नाही. मी सदैव तुझे स्मरण करत राहीन. तुझ्या आत्म्याला शांती मिळो!”, असे ट्विट करत त्याने आईच्या निधनाची बातमी दिली होती. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत राशिद खानला वडील आणि आई दोघांनाही गमवावे लागले.