‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात अंकित चव्हाणला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर २ जून रोजी होणाऱ्या त्याच्या विवाहाचे काय होणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात जमलेल्या या विवाहाचा ‘डाव’ अध्र्यावरच मोडणार, असेच अंकितच्या कुटुंबियांसह त्याच्या होणाऱ्या अर्धागिनीच्या कुटुंबीयांनाही वाटत होते. दिल्ली न्यायालयाने अंकितला अंतरिम जामीन मंजूर केला तरी त्याला लग्नानंतर पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. पण तरीही त्याची भावी पत्नी नेहा सांबरी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मी काही झाले तरी अंकितशीच लग्न करणार, हे तिने अंकितला अटक झाल्यावरच घरच्यांना स्पष्टपणे सांगितले होते.
‘‘मी अंकितला आठ वर्षांपासून ओळखत आहे. क्रिकेटवर त्याचे नितांत प्रेम असून तो क्रिकेटला कधीही धोका देणार नाही, याची मला खात्री आहे. विवाहाविषयी पुनर्विचार करण्यासाठी अंकितच्या घरच्यांनी मला सांगितले होते. पण मी माझ्या लग्नावर ठाम आहे, हे मी त्यांना लगेचच सांगितले होते. लग्न मोडण्याचा मी कधीही विचार केला नव्हता. त्याच्या घरच्यांशी मी कधीच एकरूप झाले आहे. रविवारी मी अंकितशी विवाहबंधनात अडकणार आहे. दोन्ही कुटुंबीय अंकितच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत,’’ असे माहिती आणि तंत्रज्ञान सल्लागार असलेल्या नेहाने सांगितले.