तब्बल ४ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झालेली असली तरीही भारतीय खेळाडू अद्याप मैदानात उतरलेले नाहीत. आयपीएलचा तेरावा हंगाम हा बीसीसीायसाठी पहिलं प्राधान्य असल्यामुळे, भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी इतक्या लवकर मैदानात उतरणार नाहीयेत. अनेक भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली असली तरीही बहुतांश खेळाडू हे लॉकडाउनच्या नियमांमुळे घरीच आहेत. भारतीय संघांचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या मते लॉकडाउन हे दुधारी तलवारीसारखं आहे. या लॉकडाउनचा आपल्याला फायदाच होणार असल्याचं शमीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

लॉकडाउन काळात शमी उत्तर प्रदेशातील सहारनपूर या आपल्या घरी आहे. आपल्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर शमीने नेट्स बांधून गोलंदाजीचा सराव करायला सुरुवात केली आहे. “लॉकडाउनकडे तुम्ही कसं पाहता हे तुमच्यावर आहे. भारतीय खेळाडू नेहमी व्यस्त वेळापत्रकाची तक्रार करत असतात. त्यामुळे हा कालावधी तुम्हाला तुमच्या शरीराला आराम देण्यासाठी वापरता येईल. पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला सराव करता येत नसल्यामुळे तुम्ही तुमचा फॉर्म हरवून बसण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे-तोटे असतात तसेच लॉकडाउनचेही आहेत. लॉकडाउन ही एक दुधारी तलवार आहे”, शमीने आपलं मत मांडलं.

ज्यावेळी बीसीसीआय भारतीय खेळाडूंसाठी कँपचं आयोजन करेल त्यावेळी आपल्याला फायदाच होणार असल्याचं शमीने सांगितलं. शहरातील खेळाडूंना लॉकडाउनमुळे बाहेर पडता येत नाही. पण माझ्या घराबाहेरच मैदान असल्यामुळे मला कधी त्रास जाणवला नाही. गेल्या काही दिवसांपासून मी चांगल्या फॉर्मात आहे, गोलंदाजी करताना मला कसला त्रासही होत नसल्याचं शमीने सांगितलं. शमीने सोशल मीडियावर सराव करतानाचे आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. शमी आयपीएलमध्ये पंजाब संघाकडून खेळतो.