Ind vs Eng : इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयात शेवटच्या डावात जसप्रीत बुमराह हा विजयाचा शिल्पकार ठरला. जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी संपूर्ण १ सत्र खेळून काढले. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी केली. पण जसप्रीत बुमराहच्या हाती नवा चेंडू दिल्यांनतर त्याने भेदक मारा करत डावात एकूण ५ बळी टिपले आणि भारताला विजय मिळवून दिला. सर्व स्तरातून त्याच्या गोलंदाजीची स्तुती झाली. मात्र विंडीजचे माजी गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी बुमराबाबत मुक्ताफळं उधळली आहेत.

सामना चालू असताना होल्डिंग समालोचन करत होते. तेव्हा त्यांनी बुमराह हा नव्या चेंडूने तितका प्रभावी गोलंदाजी करू शकत नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर बुमराहने आपल्या गोलंदाजीने टीकाकारांना उत्तर दिले. पण तरीदेखील मायकल होल्डिंग यांनी आपल्या मुद्द्यावर ठाम राहत ‘बुमराहने चांगली कामगिरी केली असली, तरीही मी त्याला सलामीचा गोलंदाजी म्हणून निवडले नसते’, असे मत व्यक्त केले.

इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे नव्या चेंडूंने चांगली गोलंदाजी करतात. त्यांना चेंडू स्विंग करण्याची कला अवगत आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत बुमराहपेक्षा मी या दोघांवर सलमीचे गोलंदाज म्हणून अधिक विश्वास ठेवेन, असे होल्डिंग म्हणाले.

बुमराहसंबंधी अशा वक्तव्यबाबत खुलासा करताना होल्डिंग म्हणाले की बुमराह ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो, ती गोलंदाजी इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर यशस्वी आहे.मात्र अशा पद्धतीची गोलंदाजी दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियात प्रभावी ठरणार नाही. त्यामुळे मी त्याला चेंडू थोडासा जुना झाला की गोलंदाजी देण्याचा विचार करेन, असे त्यांनी नमूद केले.