पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजयाचा हिरो गौतम गंभीरवर टीका केली होती. गंभीरकडे व्यक्तिमत्त्व नाही. तो खूप अहंकारी आहे, अशी टीका आफ्रिदीने ‘गेम चेंजर’या आत्मचरित्रात केली आहे. त्याच्या या टीकेला गंभीरने आता चोख प्रत्युत्तर दिले आहे. आफ्रिदीला मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याचा सल्लाही गंभीरने दिला आहे. तसंच, मी स्वत: तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन असंही म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण –
आफ्रिदीने ‘गेम चेंजर’ या नावाने आत्मचरित्र लिहिले असून, त्यामध्ये गंभीरचा उल्लेख करताना आफ्रिदीने, ‘गंभीरकडे व्यक्तिमत्त्व नाही. तो खूप अहंकारी आहे, अशी टीका केली. गंभीर एक खेळाडू म्हणून सतत नकारात्मकता जोपासत मैदानात वावरायचा. गंभीरकडे खूप अॅटिट्यूट आहे, त्या तुलनेत काहीच कामगिरी नाही, असे म्हणतानाच गंभीर म्हणजे डॉन ब्रॅडमॅन आणि जेम्स बाँड यांच्यातील संकर असल्यासारखे वाटते, अशा लोकांना आम्ही कराचीमध्ये सरियल (सनकी) म्हणतो’, असा उल्लेख त्याने केला. ‘मला आनंदी आणि सकारात्मक लोक आवडतात. तुम्ही रागीट आणि स्पर्धात्मक वर्तणूक करीत असाल तरी हरकत नाही; मात्र तुम्ही सकारात्मक असावे. गंभीर तसा मुळीच नव्हता’ असं आफ्रिदीने म्हटलं.


गंभीरचं प्रत्युत्तर –
‘आफ्रिदी, तुझी टीका ही फार हास्यास्पद आहे. भारतामध्ये अजूनही पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी व्हिसा देण्यात येतो. तू ये, मी स्वत: तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जातो,’ असे प्रत्युत्तर गंभीरने ट्विटरद्वारे दिलं आहे.