04 March 2021

News Flash

‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवीन’

केंद्र शासनाने ग्रामीण परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे यासाठी मी पाठपुरावा करीत आहे.

माईर्स एमआयटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरअभियांत्रिकी क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळविणाऱ्या एमआयटी संघाचे खेळाडू प्रमुख पाहुण्यांसमवेत.

माईर्स एमआयटीतर्फे आयोजित करण्यात सत्कार सोहळ्यात रोइंगपटू दत्तू भोकनळची ग्वाही

रिओ येथील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही माझ्यासाठी पहिलीच ऑलिम्पिक होती. तेथे पदक मिळविण्यात मला यश मिळाले नसले तरी तेथील अनुभव माझ्या भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त ठरला आहे. त्याच्या जोरावर मी टोकियो येथे ऑलिम्पिक पदक मिळवीन, असा आत्मविश्वास ऑलिम्पिक रोईंगपटू दत्तू भोकनळ याने येथे व्यक्त केला.

माईर्स एमआयटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतर अभियांत्रिकी क्रीडा स्पर्धेचा समारोप भोकनळ व त्याचे प्रशिक्षक राजेंद्र शेळके यांच्या हस्ते झाला. या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे तसेच एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित होते.

भोकनळ याने पुढे सांगितले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये कठोर मेहनत व सातत्यपूर्ण सराव याच्या जोरावरच यश मिळविता येते. खेळाडूंनी केवळ स्थानिक स्तरावरील स्पर्धामधील यशावर समाधान न मानता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे यश मिळविता येईल याचा विचार केला पाहिजे.

ध्यानचंद पुरस्कार विजेते शेळके यांनी सांगितले, शाळा व महाविद्यालयीन स्तरावर अधिकाधिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे. अशा स्पर्धामधूनच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो व प्रतिस्पर्धी खेळाडूंशी कशी स्पर्धा करायची याचे ज्ञानही प्राप्त होते. ग्रामीण विभागात क्रीडा प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशास केवळ दोनच पदके मिळाली असली तरी पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी मला खात्री आहे.

संभाजीराजे यांनी ग्रामीण परिसरातील क्रीडा विकासावर भर देण्याचे आवाहन करीत सांगितले, ग्रामीण परिसरात खेळासाठी भरपूर नैपुण्य उपलब्ध असते मात्र त्यांच्या नैपुण्यगुणांना अपेक्षेइतकी संधी मिळत नाही. केंद्र शासनाने ग्रामीण परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे यासाठी मी पाठपुरावा करीत आहे.

या स्पर्धेत एमआयटी संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. एमआयटी अभियांत्रिकी संघास उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेतील पंधरा क्रीडा प्रकारांमध्ये देशातील ८९ महाविद्यालयातील चार हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 2:56 am

Web Title: i will win medal in tokyo olympic says dattu bhokanal
Next Stories
1 जिद्द, चिकाटी असल्यास यशाची खात्री
2 भज्जीचा ‘दुसरा’ आजही पॉन्टिंगची झोप उडवितो…
3 सुनील छेत्री हा भारताचा आधारस्तंभ – कॉन्स्टन्टाइन
Just Now!
X