भारताची अव्वल धावपटू अंजू बॉबी जॉर्जच्या २००५ मध्ये माँटे कालरे येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब झाले. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाने या स्पर्धेतील निकालांसंदर्भात अधिकृतरीत्या बदल केले. त्यानुसार सुवर्णपदक अंजूला मिळणार यावर अधिकृत मोहोर उमटली. अंजूने लांब उडी प्रकारात ६.७५ मीटर अंतराची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली होती. रशियाच्या तात्याना कोटोव्हाने सुवर्णपदक पटकावले होते. मात्र नंतर घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत कोटोव्हा दोषी आढळली होती. यामुळे पदक विजेत्यांना बढती मिळाली आणि अंजू बॉबी जॉर्जचे सुवर्णपदक निश्चित झाले. प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अंजूने मिळवलेल्या या यशासाठी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी अंजूचे अभिनंदन केले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सुवर्णपदक अंजूने पटकावणे समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. संपूर्ण देशासाठी आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स विश्वासाठी हा गौरवास्पद क्षण असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. ‘भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ, प्रशिक्षक तसेच अ‍ॅथलेटिक्सचे चाहते यांचे मनापासून आभार मानते. भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी हा अविस्मरणीय क्षण आहे’ असे अंजूने सांगितले.  या यशासह जागतिक अ‍ॅथलेटिक्स अंतिम फेरीत सुवर्णपदकावर नाव कोरणारी अंजू पहिली भारतीय अ‍ॅथलिट ठरली आहे.