यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, पण या दोन्ही संघांमध्ये फक्त एकच फरक होता आणि त्यामुळेच हा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे इयान बेल. ‘‘बेलला तुम्ही इंग्लंडच्या संघातून काढून बघा, दोन्ही संघांमध्ये इंग्लंडचा संघ वरचढ दिसणार नाही,’’ अशा स्तुतिसुमनांचा वर्षांव त्याच्यावर केला आहे तो ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने. यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मॅकग्राने केलेली वक्तव्ये ही तंतोतंत खरी जाणवतात. इंग्लंडच्या संघात जर बेल नसला असता तर इंग्लंडच्या संघाचेही बारा वाजले असते. कारण या मालिकेतील त्याची तिन्ही शतके संघ अडचणीत सापडलेला असताना झालेली आहेत. इंग्लंडसाठी तो संकटमोचक, तर प्रतिस्पध्र्यासाठी तो ‘धोक्याची घंटा’ ठरत आहे.
१९९९ साली वार्विकशायरकडून पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता, पण त्यानंतर दोन वर्षांनीच त्याने  धावांच्या राशी उभारत आपली वार्विकशायर संघातील जागा पक्की केली. त्यानंतर २००४ सालच्या मोसमात १९४८ धावा करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने ७० धावा केल्या. त्यानंतर सातत्याने चांगल्या धावा होत असल्यामुळेच ग्रॅहम थॉर्पला वगळून बेलला संधी देण्यात आली; पण या मालिकेत त्याची सरासरी विशीच्या आतमध्येच होती. त्यानंतरच्या २००७, २००९ आणि २०११च्या अ‍ॅशेस मालिकेमध्ये त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसतानाही त्याला यंदाच्या मालिकेत स्थान दिले. तोच संघासाठी तारणहार ठरला.
संघ सुस्थितीत असताना चांगली खेळी करणारा खेळाडू, असा ठपका त्याच्यावर काही समीक्षकांनी ठेवलेला होता, तो त्याने या मालिकेत खोटा ठरवून दाखवला. भारतीय संघ जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर होता तेव्हा त्याच्यातली ही चमक दिसली होती, पण यंदाच्या अ‍ॅशेसमध्ये या हिऱ्याच्या तेजाने साऱ्यांचेच डोळे दिपवले. नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला असताना तब्बल साडेसहा तास खेळपट्टीवर ठाण मांडत त्याने शतक झळकावले आणि संघाला संकटातून बाहेर काढले. या वेळी स्टुअर्ट ब्रॉडबरोबर सातव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी रचली होती. लॉर्ड्सच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडची ३ बाद २८ अशी अवस्था असताना क्रिकेटच्या पंढरीत त्याने शतक झळकावत इंग्लंडला पुन्हा एकदा संकटातून बाहेर काढले, तर चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावत त्याने ऑस्ट्रेलियाच्या तोंडचे पाणी पळवले. यंदाच्या अ‍ॅशेसमध्ये तब्बल ५६२ धावांचा डोंगर त्याने तब्बल ६२च्या सरासरीने उभारला.
मानांकित आणि अनुभवी खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानापासून ते सहाव्या स्थानापर्यंतच्या प्रत्येक स्थानावर बेलने फलंदाजी केली व आपली उपयुक्तता दाखवून दिली. जसा तो सलामीवीर झटपट बाद झाल्यावर नवीन चेंडूचा लीलया सामना करतो तसाच तो तळाच्या फलंदाजांना घेऊन मोठी धावसंख्या उभारताना दिसतो. इंग्लंडला यापूर्वी बरेच महान फलंदाज मिळाले ज्यांनी बऱ्याचदा संघाला संकटातून बाहेर काढून विजयपथावर आणले. त्यांच्याच मांदियाळीत बेलही बसणारा आहे. यापुढे सातत्याच्या जोरावर धावांची टांकसाळ त्याने कायम ठेवली तर क्रिकेटविश्वात त्याचेही नाव निश्चितपणे सुवर्णाक्षरात लिहिले जाईल.