ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १७ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अॅडलेडच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत उप-कर्णधार अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांनी अजिंक्यच्या कर्णधारपदाच्या शैलीचं कौतुक करत तो चांगला कर्णधार असल्याचं म्हटलं आहे.

“मी अजिंक्यला ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळा कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करताना पाहिलं आहे. तो चांगलं नेतृत्व करतो, तो आक्रमक कर्णधार आहे. त्याच्या शैलीबद्दलचे काही चांगले गुण माझ्या लक्षात आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात चांगली खेळी करत होता. डेव्हिड वॉर्नर खेळपट्टीवर स्थिरावला होता, अशा परिस्थितीत त्याने पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या कुलदीप यादवला संधी दिली आणि कुलदीपने वॉर्नरला बाद केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव कोलमडला होता. लक्ष्य कमी असतानाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीयांनी नांगी टाकली. परंतू अजिंक्य रहाणेने प्रसंगांचं गांभीर्य ओळखत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल करत २७ चेंडूत ३८ धावा केल्या, मला त्याचा हा दृष्टीकोन खूप आवडला.” चॅपल पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

कर्णधार म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे आक्रमक स्वभावाचा आणि एक म्हणजे शांत राहून रणनिती आखून निर्णय घेणारा. माझी पहिली पसंती ही नेहमी आक्रमक स्वभावाच्या कर्णधाराला राहिली आहे, अजिंक्य आक्रमक कर्णधार आहे, अशा शब्दांत चॅपल यांनी रहाणेचं कौतुक केलं. प्रदीर्घ कालावधीनंतर पहिला आंतरराष्ट्रीय दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. वन-डे मालिकेत भारताला २-१ ने पराभव स्विकारावा लागला. परंतू टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवत भारतीय संघाने वन-डे मालिकेतल्या पराभवाची परतफेड केली. त्यामुळे कसोटी मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.