बहुचर्चित इंडियन बॅडमिंटन लीगचा (आयबीएल) लिलाव सोहळा सोमवारी झाला. मात्र सतत बदलणारे नियम, समन्वयाचा अभाव आणि आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठीची कसरत यामुळे दोन ‘आयकॉन’ खेळाडूंची पायाभूत किंमत (बेसप्राइस) कमी करून निम्म्यावर आणल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या महिला बॅडमिंटनपटूंना याचा फटका बसला आहे.
आयबीएल स्पर्धेसाठी सायना नेहवाल, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा, पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप आणि मलेशियाचा ली चोंग वेई यांना ‘आयकॉन’ खेळाडूचा दर्जा देण्यात आला होता. या सहा खेळाडूंना पायाभूत किंमत प्रत्येकी ५०,००० अमेरिकन डॉलर एवढी निश्चित करण्यात आली होती. कुठल्याही फ्रँचायझीने खरेदी केले तरी या खेळाडूंना किमान एवढी रक्कम मिळेल असा याचा मथितार्थ.
मात्र महिला दुहेरीत लोकप्रिय खेळाडूंची वानवा, सामन्यांना मिळणारा प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद, यामुळे आयबीएल संयोजकांनी महिला दुहेरी हा प्रकारच काढून टाकला. या निर्णयामुळे ज्वाला तसेच अश्विनी यांचे स्पर्धेतील अस्तित्व मिश्र दुहेरीच्या एका लढतीपुरते मर्यादित झाले. त्यामुळे ‘आयकॉन’ खेळाडू असूनही त्यांना खरेदी करण्यासाठी बेसप्राइसची मोठी रक्कम खर्च करण्यास फ्रँचायझींनी नकार दिला. आर्थिक आणि स्पर्धात्मक समीकरणे लक्षात घेतली तर त्यांची भूमिका रास्त होती. यावर तोडगा म्हणून आयबीएल व्यवस्थापन आणि सहा फ्रँचायझी यांच्यात गुप्त बैठक झाली. त्यानुसार या दोघींची बेसप्राइज ५०,००० अमेरिकन डॉलरवरून २५,००० अमेरिकन डॉलर अशी कमी करण्यात आली. फ्रँचायझींना आर्थिक फटका बसू नये, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीबाबत तसेच निर्णयाबाबत ज्वाला आणि अश्विनीला कल्पना देण्यात आली नाही.
गेले काही दिवस आयबीएलच्या प्रचारासाठी या दोघी ‘आयकॉन’ खेळाडू म्हणून विविध कार्यक्रमांत वावरताना दिसत होत्या. मात्र महिला दुहेरी प्रकारच नसल्याने त्यांची संघातली उपयुक्तता कमी झाली आणि याचा थेट फटका त्यांच्या बेसप्राइसला बसला. कुठल्याही खेळाच्या लीगमध्ये ‘आयकॉन’ खेळाडू हे हुकमी एक्के असतात. त्यांच्यानुसार संघाची रचना, डावपेच आखले जातात. मात्र आयबीएल व्यवस्थापनाने या दोन खेळाडूंना देण्यात येणारी रक्कम निम्म्यावर आणून त्यांचे महत्त्व कमी केले.
दरम्यान, या दोघींचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आयबीएल व्यवस्थापनाने शक्कल लढवली आहे. फ्रँचायझींनी या दोघींना लिलावात सुधारित बेसप्राइजनुसार विकत घेतले. त्यांच्या मूळ बेसप्राइसमधून विकत घेतलेली रक्कम वजा केली जाईल आणि जी रक्कम समोर येईल, ती रक्कम ज्वाला आणि अश्विनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आधीची पायाभूत किंमत आणि लिलावात मिळालेली रक्कम, यामध्ये झालेली नुकसानभरपाई ज्वाला आणि अश्विनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा भार फ्रँचायझींना उचलायचा का आयबीएल व्यवस्थापनाने याबाबत साशंकता आहे.

आम्ही या स्पर्धेत पैशांसाठी खेळत नाही. मुद्दा पैशांपेक्षा सन्मानाचा आहे. अन्य ‘आयकॉन’ खेळाडूंना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली, तेवढीच आम्हाला मिळावी, एवढीच अपेक्षा होती. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. एवढय़ा मोठय़ा स्वरूपाच्या लीगमध्ये असा प्रकार घडेल, असे वाटले नव्हते.                       – ज्वाला गट्टा

हा सरळ विश्वासघात आहे. कालपर्यंत आम्ही ‘आयकॉन’ खेळाडू म्हणून वावरत होतो. लिलावापूर्वी एवढा मोठा बदल करण्यात आला, मात्र त्याची साधी कल्पनाही आम्हाला देण्यात आली नाही. आम्हीही देशाला पदक मिळवून दिले आहे. पैशापेक्षाही ज्या पद्धतीने ही गोष्ट हाताळण्यात आली, ते अधिक दुखावणारे होते.
    – अश्विनी पोनप्पा